सडावाघापूरच्या धबधब्याला हुल्लडबाजांचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

तारळे - पाच ते सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, निसर्गाचे वरदान लाभलेल्या या पर्यटनस्थळाला आता हुल्लडबाजांचे ग्रहण लागू पाहात आहे.  

तारळे - पाच ते सहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सडावाघापूर (ता. पाटण) येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, निसर्गाचे वरदान लाभलेल्या या पर्यटनस्थळाला आता हुल्लडबाजांचे ग्रहण लागू पाहात आहे.  

पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलते. पाचगणीच्या टेबल लॅंडच्या धर्तीवर येथे विस्तीर्ण पठार आहे. धुक्‍यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्‍क्‍या, दाट धुक्‍याची दुलई, धुक्‍यात हरवलेला रस्ता, हिरव्यागार गवताचा गालिचा, सोसाट्याचा गार वारा, मन व तण चिंब करणारा पाऊस, घाटातून फेसाळत येणारे छोटे-मोठे धबधबे, पठारावरून दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृश्‍य, गढूळ पाण्याने भरून वाहणारी कोयनामाई, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, खोल दरी, जणू काय निसर्गाने आपला सर्व खजिना  याच ठिकाणी रिता केला आहे असे वाटावे, असे प्रसन्न करणारे वातावरण प्रत्येकाच्या मनाला सुखद आनंद देते. या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉइंट) पाहण्यासाठी तरुणाईबरोबरच महिला-पुरुष पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.

तरुणाईची हुल्लडबाजी
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या पर्यटनस्थळाला मात्र, हुल्लडबाजांचे ग्रहण लागू पाहात आहे. शांततेचा भंग करत मोठ्या आवाजात लावलेली गाड्यांमधील गाणी, त्यावर कपडे काढून थिरकणारी तरुणाई इथल्या वातावरणाला बाधा पोचवत आहेत. बऱ्याच वेळा मद्यपान करून काही वेळा मद्याच्या बाटल्या हातात घेऊन बिभत्स नाचणारी तरुणाई या पर्यटनस्थळाला गालबोट लावत आहे. त्याचा या ठिकाणी येणाऱ्या महिला पर्यटकांसह कुटुंबासहित आलेल्यांना त्रास होत आहे. त्यामुळे ही मंडळी येथून काढता पाय घेत आहेत. लांबवरून आलेल्या पर्यटकांचा या कारणांनी हिरमोड होत आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट येणे, घाटातून भरधाव गाडी हाकणे यामुळे प्रवासादरम्यानही त्यांचा त्रास जाणवतो. सार्वजनिक वातावरण बिघडविणाऱ्या या तरुणाईला अटकाव झाला पाहिजे, अशी भावना महिला पर्यटकांकडून व्यक्त होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षेसाठी अथवा या तरुणांना रोखणारी यंत्रणा नसल्याने अशांचा धीर वाढत चालल्याचे दिसते आहे. त्यामुळे येथे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. याबरोबरच जीव धोक्‍यात घालून कड्याजवळ धोकादायक स्थितीत वावरणे, निसरड्या पठारावर भान हरपून बेधुंद होत नाचण्यामुळे पाय घसरून अपघात होण्याचा धोका असतो. मात्र, या तरुणांना त्याचेही कसलेच भान नसते. पठारावर वाऱ्याचा प्रचंड दाब असतो, अशा वेळी तोल जाण्याचा धोका सदोदित असतो. त्याकडे दुर्लक्ष करणे जिवावर बेतू शकते.

सुटीच्या दिवशी बंदोबस्त हवा
सडावाघापूर येथील उलटा धबधब्यावर (रिव्हर्स पॉइंट) सलग सुटी, रविवारी अशा दिवशी तरी बंदोबस्ताची यंत्रणा उभारली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: satara news waterfall rain