‘फीडबॅक मशिन’द्वारे स्वच्छतेवर लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

बोलक्‍या भिंती अन्‌ कचरा पेट्याही!
स्वच्छताविषयक जनजागृती होण्यासाठी पालिकेने शहरातील काही दर्शनी भिंती चित्र व प्रबोधनात्मक घोषवाक्‍यांच्या माध्यमातून बोलक्‍या केल्या. मुख्य बाजारपेठेत, ठिकठिकाणी ओला व सुका कचऱ्याच्या २५ पेट्यांच्या जोड्या बसविल्या गेल्या. कॅलेंडर, टोप्या, टी शर्ट, पिशव्या, स्टिकर्स आदींच्या माध्यमातून ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येत आहे.

सातारा - स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत केंद्र शासनाचे पाहणी पथक उद्या (ता. १) व शुक्रवारी (ता. २) साताऱ्यात येत आहे. त्याकरिता पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतेवर पुरेपूर लक्ष, बोलक्‍या भिंती, सुशोभित दुभाजक या भौतिक सुधारणांबरोबरच दृक्‌ व श्राव्य अशा विविध प्रचार साहित्यांच्या माध्यमातून सातारा पालिकेने ‘आम्ही सज्ज आहोत,’ असा संदेश दिला आहे. ‘फीडबॅक मशिन’च्या माध्यमातून पालिका आता सार्वजनिक स्वच्छतागृहांतील स्वच्छतेबाबत लक्ष ठेवणार आहे. 
देशभरातील चार हजार ४१ शहरांमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ अंतर्गत स्वच्छताविषयक स्पर्धा घेतली जात आहे. या अभियानात पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती उद्यापासून दोन दिवस साताऱ्यात राहणार आहे. 

तीन ठिकाणी फीडबॅक मशिन
सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे नाक मुठीत धरून जाण्याचे ठिकाण, असे सर्वसाधारण चित्र असते. मात्र, साताऱ्यात या उलट चित्र आहे. कारण पालिकेने या ठिकाणी स्वच्छतेबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आधुनिक मशिन बसविले आहे. या फीडबॅक मशिनच्या माध्यमातून पालिकेला सार्वजनिक स्वच्छतागृहांतील स्वच्छतेबाबत लक्ष ठेवता येत आहे. मुख्य बस स्थानक, राजवाडा बस स्थानक व महिला मंडळाजवळील सुलभ शौचालय या तीन ठिकाणी ही मशिन बसविण्यात आली आहेत. 

कचऱ्याचे विलगीकरण
ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी पालिकेने नागरिकांमध्ये प्रबोधन मोहीम राबविली. शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे ८० टन कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत घेतला जातो. त्यातील ओल्या कचऱ्यावर शहरात पाच ठिकाणी प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते. या खताला शासनाची ‘हरित महासिटी कंपोस्ट’ अशी मान्यतेची मोहर उमटली आहे. एक रुपया प्रति किलो या दराने हे खत नागरिकांना विक्रीस उपलब्ध आहे. 

कचरा कोंडाळी सुशोभित
घंटागाडी पद्धतीमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणची कचरा कोंडाळी हटविण्यात आली. तरीही काही आळशी लोक रस्त्याचा कोपरा, मोकळा प्लॉट आदी ठिकाणी कचरा टाकत होते. कचरा पडणाऱ्या अशा शहरातील सात जागांची पालिकेने स्वच्छता केली. तेथे पुन्हा कचरा पडू नये यासाठी त्या जागांचे सुशोभिकरण करण्यात आले. परिणामी ही सातही ठिकाणे कचरामुक्त आहेत.

Web Title: satara news western maharashtra news cleaning feedback machine municipal