राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सातारा - कोकण दौऱ्यावर जाताना राज ठाकरेंची साताऱ्यातील कार्यकर्त्यांना भेट घालून देण्यास बाळा नांदगावकर आणि सांगलीच्या नेत्याने टाळाटाळ केली होती. त्यातून नाराज झालेल्या येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा उगारत राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांना पक्षांतर करण्याचा सल्ला दिला. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या (गुरुवारी) साताऱ्यात येत आहेत. या दौऱ्यात ते श्री. मोझर यांना कोणता कानमंत्र देणार, याचीच उत्सुकता आहे.

‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे हे यापूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. पण, ते दुष्काळी भागाची पाहणी करण्याच्या उद्देशाने आले आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निघून गेले. यावेळेस त्यांचा साताऱ्यात पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ते आपली भूमिका आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणते बाळकडू देणार,

मोझरांसह पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून मिळणार ताकद
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. तरीही संदीप मोझर यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून ‘मनसे’ वाढवण्याचे काम केले. मोझर यांचे संघटन कौशल्यही त्यात महत्त्वाचे ठरले आहे. उद्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोझर यांच्यासह त्यांच्या शिलेदारांना राज ठाकरे ताकद देणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

स्वागताची जंगी तयारी...
जिल्हा ‘मनसे’तर्फे राज ठाकरे यांचे उद्या (गुरुवारी) जंगी स्वागत करण्याची तयारी श्री. मोझर यांनी केली आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुलेंची कुलभूमी कटगुण (ता. खटाव) येथून क्रांतिज्योत आणण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या सरहद्दीवर शिरवळनजीक नीरा नदीजवळ स्वागत कमान उभारून तेथे राज ठाकरे यांचे जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. महामार्गावर सुरूर, भुईंज, आनेवाडी, लिंब खिंड येथेही जोरदार स्वागत करण्याची तयारी केली आहे. त्याशिवाय दुचाकी रॅली, नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सत्कार आणि काहींचा पक्षप्रवेशही मेळाव्यावेळी होणार आहे.

प्रलंबित प्रश्‍नांबाबत काय भूमिका घेणार?
सातारा जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्‍न प्रलंबित आहेत. मेडिकल कॉलेज, धरणे व कालव्यांची कामे, महामार्गाचे सहपदरीकरणाचे रखडलेले काम यांसह अनेक कामांबाबत सत्ताधाऱ्यांकडून हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिलेली कामेही रखडली आहेत. या प्रश्‍नांबाबत राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार, ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांना कोणता आदेश देणार, याविषयी जिल्हावासीयांत उत्सुकता आहे.

Web Title: satara news western maharashtra news raj thackeray meeting