दारूधंद्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्‍यात

प्रवीण जाधव
शनिवार, 20 जानेवारी 2018

सातारा - कोडोली येथील कालव्याजवळील बस थांब्याशेजारी बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यामुळे परिसरातील महिला व युवतींची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. याबाबत महिला व युवकांनी निवेदन देऊनही हा दारूधंदा खुलेआम सुरू आहे. त्यामुळे या धंद्यांना पोलिसांचा आश्रय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सातारा - कोडोली येथील कालव्याजवळील बस थांब्याशेजारी बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या धंद्यामुळे परिसरातील महिला व युवतींची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. याबाबत महिला व युवकांनी निवेदन देऊनही हा दारूधंदा खुलेआम सुरू आहे. त्यामुळे या धंद्यांना पोलिसांचा आश्रय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सातारा-रहिमतपूर रस्त्यावर कोडोली येथे नवीन औद्योगिक वसाहत कॅनॉल बस थांबा आहे. कोडोली परिसरातील दत्तनगर, काळोशी, पांढरवाडी, नवीन औद्योगिक वसाहत या परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी हा बस थांबा महत्त्वाचा आहे. त्यातही प्रामुख्याने महाविद्यालयात येणारे युवक व युवती याच थांब्यावरून ये-जा करत असतात. शहरात कामासाठी येणाऱ्या महिलाही येथे उतरत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून या बस थांब्याच्या लगत अवैध दारूधंदा सुरू झालेला आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून मद्यपींची या धंद्यावर रांग लागत असते. ही रांग रात्री साडेनऊ- दहापर्यंत सुरूच असते. दारू पिण्यासाठी येणारी अनेक टोळकी या धंद्याशेजारी वडाच्या झाडाला असलेल्या पारावर तसेच जवळ असलेल्या कॅनॉलच्या कठड्यांवरच ठाण मांडून असतात. या टोळक्‍यांमुळे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या महिला व युवतींना त्रास होतो आहे. अनेकदा त्यांच्याकडून छेडछाडीचे प्रकारही घडले आहेत. या अवैध धंद्यामुळे अनेक युवकही दारूच्या आहारी जात आहेत. त्यातून दोन युवकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे या अवैध धंद्याबाबत नागरिकांमध्ये मोठी चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी संघटितपणे अवैध व्यवसायाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यातून परिसरातील सुमारे दीडशे महिला, नागरिकांबरोबर कोडोली व दत्तनगरचे उपसरपंच व सदस्यांनी मंगळवारी (ता. १६) अवैध दारूधंदा बंद करण्याबाबत औद्योगिक वसाहत पोलिस चौकीच्या पोलिसांना निवेदन दिले. 

एवढ्या मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी निवेदन देऊनही औद्योगिक वसाहत पोलिस चौकीच्या पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली. त्या वेळीही अवैध धंदा सुरूच होता. तरीही त्याच्यावर कारवाई केली नाही. उलट तुम्हीच त्यांना पकडून द्या, असा सल्ला पोलिसांकडून नागरिकांना दिला गेला. बुधवारी परिसरातील नागरिकांनी पोलिसांसमोर अवैध धंद्यावरील बाटल्यांचे पोते ओतले. ते पोलिस घेऊन गेले. काय कारवाई केली, याबाबत नागरिकांना माहिती दिली नाही. मात्र, अजूनही त्याच ठिकाणी दारूचा अवैध धंदा खुलेआम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांचा उपयोग काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title: satara news women security danger by alcohol business