जागा अनिश्‍चितेत अडकला  ‘डीपीआरसी’चा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सातारा - राजीव गांधी पंचायत राज सशक्‍तीकरण अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदेला स्वत:चे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे; परंतु एक महिना उलटूनही जागा निश्‍चित झाली नाही. त्यामुळे अद्यापही जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीआरसी) उभारण्याबाबत ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला नाही. प्रथम येणाऱ्या प्रस्तावांना प्राधान्य असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.

पुणे येथील ‘यशदा’ प्रशिक्षण केंद्रात विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यास जावे लागते. ग्रामविकास विभागाच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्‍तीकरण अभियानांतर्गत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष पुणे कार्यालयाने यशदा प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या वर्षात जिल्हा पंचायत संसाधन केंद्र उभारण्यासाठी निधी दिला जाणार आहे. त्यासाठी प्रथम प्रस्ताव देणाऱ्या १२ जिल्हा परिषदांना प्राधान्य अग्रक्रम दिला जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेलाही संधी उपलब्ध झाली आहे. 

या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. शिवाय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा अधिकारी, त्याखाली प्रशिक्षण देण्यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारही असणार आहेत. शिवाय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय, प्रशासकीय प्रशिक्षणे या केंद्रात घेतली जातील. १०० आसन क्षमतेचा प्रशिक्षण हॉल, १०० आसन क्षमतेचे सभागृह, दोन वर्ग खोल्या, ग्रंथालय, ५० बेडची निवास व्यवस्था, किचन आणि ५० लोकांचे भोजनालय, संगणक कक्ष, कार्यालय आदी या केंद्रात असणार आहे.  

हे केंद्र सातारा जिल्हा परिषदेला मिळण्यासाठी जास्त संधी आहेत. गेल्या महिन्यातील सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेत घेण्यात आला. प्रतापसिंह हायस्कूल हे वारसास्थळ असल्याने तेथे हे केंद्र उभारणे अडचणीचे आहे. त्यामुळे या सभेत येथील प्रतापसिंह शेती शाळेतील एक एकर जागा या केंद्रास देण्यासाठी सभागृहाने संमती दिली होती; परंतु त्या जागेवर काही आरक्षण आहे. खावली (ता. सातारा) येथेही जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध आहे. मात्र, या प्रक्रियेला महिना उलटला, तरी त्यावर ठाम निर्णय झाला नाही. त्यामुळे आलेली संधीही दवडण्याची शक्‍यता असून, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी तत्काळ पाऊले उचलावीत.

Web Title: satara news zp DPRC