मटका व्यवसाय राेखण्यात सातारा पोलिसांना पूर्णत: अपयश

प्रवीण जाधव
सोमवार, 15 जुलै 2019

जिल्ह्यातील मटका अड्ड्यांचा पूर्ण बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ठोस मोहीम उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर मटका चालकांच्या तडीपारीलाही पुन्हा सुरवात करणे आवश्‍यक आहे.

सातारा : शहरासह जिल्ह्यामध्ये मटका व्यवसायाला रोखण्यात पोलिस दलाला अद्यापही पूर्णत: यश आलेले नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी मटका बोकाळत चालला आहे. त्यामुळे जादा पैसे मिळविण्याच्या हव्यासापायी अनेक कुटुंबातील उदरनिर्वाहाचे पैसे अड्डेवाल्यांच्या खिशात जात आहेत. त्यामुळे मटकेवाल्यांच्या तडीपारीची मोहीम पुन्हा सुरू करणे आवश्‍यक बनले आहे.
कोणतीही यंत्रणा मटका धंदा पूर्णत: बंद पाडू शकत नाही, असे नेहमी बोलले जाते. त्याची प्रचिती आजवर अनेकदा आलेली आहे. आजवरच्या अनेक पोलिस अधीक्षकांनी मटका धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला यश मिळू शकले नाही. अधीक्षकांनी जोर धरला, की काही दिवस कारवाया होतात. मोठ्या माशांना सोडून किरकोळ बुकींना पकडून 500 ते हजार रुपयांच्या कारवाया केल्या जातात. काही ठिकाणी तर वरिष्ठांचा जोर आला, की मटका अड्डा चालकांकडूनच कारवायासाठी माणसे मागण्याचा प्रताप केला जातो. शहरांमध्ये अधूनमधून काही प्रमाणात कारवाया होतात; परंतु ग्रामीण भागामध्ये या अड्ड्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष असते. जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटले, तर तालुक्‍यांच्या ठिकाणाबरोबर प्रत्येक मोठ्या गावापर्यंत मटका धंद्याचे "नेटवर्क' पसरलेले आहे. त्या ठिकाणी खुलेआम मटका चालवला जातो. मटका खेळणाऱ्यांमध्ये धनिकांचाही सहभाग आहे; परंतु त्यापेक्षा जास्त रोजंदारीवर काम करणाऱ्यानाही याचे व्यसन लागलेले आहे. जास्त पैसे मिळविण्याच्या आमिषाने युवक वर्गही या जाळ्यात ओढला जातो आहे. त्या- त्या ठिकाणच्या पोलिस यंत्रणेला या अड्ड्यांची माहिती नाही, असे नाही. त्यांनी मनावर घेतले, तर जिल्ह्यात पूर्णत: मटका बंदी होऊ शकते; परंतु यंत्रणा मनावर घेणार का हाच खरा प्रश्‍न आहे. पोलिस यंत्रणेकडून दर वर्षी जिल्हाभरात मटका अड्ड्यावर शेकडोने गुन्हे दाखल होतात; परंतु त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. किंबहुना या गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेले उदाहरणही पाहावयास मिळत नाही. मिळाली तर अत्यंत कमी असल्यामुळे मटका घेणाऱ्यांवर आणि तो चालविणाऱ्यालाही काही फरक पडत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यासाठी मटक्‍या संबंधीतील कायदाही कडक करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. मटका चालकांची ही मानसिकता ओळखून त्यांना जरब बसावी म्हणून तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कडक पावले उचलली. त्यानुसार मटका घेणारे व ते चालवणाऱ्या मालकांवर तडीपारीची कारवाई करण्याचा धडका त्यांनी लावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मटकेवाल्यांना तडीपार व्हावे लागले.
तडीपारीची कारवाई झाली, तरी अनेक जण पुन्हा त्या हद्दीत वावरत असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे तडीपार होऊनही बिनदिक्कतपणे अड्डे सुरू राहिले आहेत. अनेकांनी त्यांचे "नेटवर्क' संपूर्ण जिल्हाभर उभारले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara police completely fails to control illegal business