'या'मुळे बुडाला नाशिकचा विद्यार्थी सैनिक स्कूलच्या जलतरण तलावात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

साेमवारी (ता.24) पहाटे एकच्या सुमारास त्याचे कुटुंबीय नाशिकहून साताऱ्याला आले. शवविच्छेदनानंतर पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही निरीक्षक मांजरे यांनी सांगितले.

सातारा : चांगल्या पद्धतीने पोहायला येत नसतानाही कुणाल पाण्यात पोहण्यासाठी तलावात गेला होता. स्कूलमधील एकत्र येण्याचा शेवटचा रविवार असल्यामुळे अन्य काही मुलेही तेथे पोहताना छायाचित्र व चित्रीकरणही करत होती. त्यामध्ये कुणाल कधी पाण्यात बुडला हे त्याच्या मित्रांना समजले नाही, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले.
 
सैनिक स्कूलच्या तलावात बुडून काल कुणाल कृष्णा वाणी (रा. नाशिक) याचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 23) तलाव बंद असताना घटना नेमकी कशी घडली याची पूर्ण माहिती काल मिळू शकली नाही. त्याबाबत साेमवारी (ता.24) निरीक्षक मांजरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""कुणाला सहावीपासून सैनिक स्कूलमध्ये होता. सध्या तो बारावीत शिकत होता. दर रविवारी या मुलांना एकत्र बाहेर सोडले जाते. बारावीच्या परीक्षा सुरू होणार असल्यामुळे मागील रविवार या मुलांना सोडण्यात आले नव्हते. कालचा रविवार हा त्यांच्या बॅचचा एकत्र मजा करण्याचा शेवटा रविवार होता. परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या गावी जाणार होता. त्यानंतर कोण कुठे जाईल, तसेच कधी एकत्र येतील हे सांगता येत नव्हते. त्यामुळे या रविवारी मित्र एकत्र येऊन एकत्रित फोटो काढत, भेटी-गाठी घेत होते. हे सुरू असतानाच कुणालच्या वसतिगृहातील काही युवकांनी पोहायला जायचे ठरविले. रविवार असल्याने जलतरण तलाव बंद होता. त्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले होते; परंतु परत पोहायला मिळणार नाही, म्हणून हे युवक जलतरण तलावाला असलेल्या भिंतीवरून उड्या मारून आत गेले. कुणालही त्यांच्यासोबत गेला. त्याला फार चांगले पोहायला येत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दुसऱ्या वसतिगृहातील युवकही तेथे आले. सर्व जण पोहताना एकत्रित फोटो, सेल्फी काढत होते. पोहतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही करत होते.''

वाचा : राज्यातील सत्ता बदलानंतर पोलिस दलात बदल्यांचे वेध

कुणालनेही आपल्या मित्रांसोबत सेल्फी काढले. त्यानंतर युवक पोहण्यात मग्न झाले. त्यामध्ये कुणाल कधी बुडाला हे त्यांच्या लक्षात आले नाही. सर्व युवक एकत्रित उड्या मारण्यासाठी काठावर आले. त्या वेळी त्यांना कुणाला पाण्यात पालथा पडल्याचे दिसले. त्यानंतर दोन युवकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. याबाबतची माहिती मिळाल्यावर शाळेच्या व्यवस्थापनाने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. आज पहाटे एकच्या सुमारास त्याचे कुटुंबीय नाशिकहून साताऱ्याला आले. शवविच्छेदनानंतर पहाटे तीनच्या सुमारास मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही निरीक्षक मांजरे यांनी सांगितले.

वाचा : सदाशिवगड : मुले दरीत अडकली...पालकांचा टाहाे अन्...

हेही वाचा : सातारा : लिपिकाने मारला पाण्याच्या लाखाे रुपयांवर डल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Sainik School Student Drown In Swimming Tank

Tags
टॉपिकस
Topic Tags: