सासरे अन्‌ जावयाने वाढवली गादेवाडीकरांची चिंता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

ग्रामपंचायतीने 14 दिवसांसाठी सर्व बाजूने येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील किराणा मालापासून चक्की, दूध विक्रीपर्यंत सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

खटाव (जि.सातारा) : मुंबई (कोपरखैरणे) येथून आठवड्यापूर्वी गादेवाडी (ता.खटाव) येथे आलेल्या सासरे व जावई यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या कुटुंबातील दोनवर्षीय मुलीसह दोघांना पुसेगाव शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलविले. 

खटावजवळच्या गादेवाडी (साळुंखेवस्ती) गावात कोपरखैरणे येथून शनिवारी (ता.16) संबंधित कुटुंब गावाला आले. ग्रामपंचायतीने त्यांना क्वारंटाइन केले होते. मात्र, गावात तपासणीसाठी नेमलेल्या आशा स्वयंसेविकांना कुटुंबातील काही सदस्यांमध्ये कोरोनासंबंधीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना त्वरित शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर हे कुटुंब खटाव येथील रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांना स्वॅब तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले. यामध्ये सासरे व जावई यांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. अहवाल आल्याच्या त्याच रात्री या कुटुंबातील दोन वर्षीय चिमुकलीसह एक पुरुष (वय 70) व एक महिला (वय 27) यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्याही स्वॅब तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
 
गादेवाडी ग्रामपंचायतीच्याखाली आमलेवाडी, दौंडेवाडी, साळुंखे वस्ती या तीन वाड्यावस्त्या येतात. गावात बाधित आढळल्याने ग्रामस्थ हादरले आहेत. त्याचबरोबर खटावसह परिसरातील वाड्यावस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात सर्वत्र औषध फवारणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. 
दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार अर्चना पाटील यांनी गावाला भेट देऊन सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना आवश्‍यक उपाययोजना राबवण्यासंबंधी सूचना केल्या. गावासह परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 

गावात प्रवेशासाठी बंदी 

ग्रामपंचायतीने 14 दिवसांसाठी सर्व बाजूने येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील किराणा मालापासून चक्की, दूध विक्रीपर्यंत सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. ग्रामस्थांना सेवा पुरवण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गावातून बाहेर व बाहेरून गावात येण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती उपसरपंच जितेंद्र गायकवाड यांनी दिली.

मग अर्णवचा मृत्यू कशामुळे ?

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Two Covid 19 Paitents Found In Khatav