व्हॉट्‌सऍप ग्रुपचा वर्चस्ववादातून गोळीबार; पाच जणांना अटक

व्हॉट्‌सऍप ग्रुपचा वर्चस्ववादातून गोळीबार; पाच जणांना अटक

वाई : येथील रविवार पेठेत दोन गटांतील किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी (ता 13) रात्री आठच्या सुमारास ढगेआळीत रस्त्यालगत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी एका गटातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
अभिजित ऊर्फ भैय्या शिवाजी मोरे (रा. 185, गंगापुरी, दामले आळी, वाई) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
पोलिसांच्या माहितीनुसार, वाईच्या एमआयडीसी रस्त्यावरील ढगे आळीत शेतातील घरासमोर अभिजित लोखंडे चार मित्रांसोबत बसला होता. त्यावेळी कल्पतरू मंगल कार्यालयाकडून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (क्रमांक एमएच 11 सीडब्लू 1444) या मोटारीतून चार ते पाचजण आले. त्यापैकी अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईज, ता. वाई) याने घरासमोर बसलेल्या अभिजित लोखंडे व त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. यावेळी झालेल्या झटापटीत अर्जुन ऊर्फ राणा यादव याने हातावर काठी मारल्याने बंटी जाधवच्या हातातील पिस्तूल खाली पडले. ते घेऊन अर्जुनने बंटी जाधव व त्याच्या मित्रांवर गोळीबार केला. यावेळी एक गोळी भैय्या मोरेच्या छातीच्या खालील भागात बरकडीत घुसून तो गंभीर जखमी झाला. त्याला मित्रांनी तातडीने मोटारीत घालून सुरवातीला सातारा येथे व नंतर पुण्याला उपचारासाठी दाखल केले.
 
मागील चार-पाच दिवसांपासून रविवार पेठेतील सोन्या शिंदे व अभिजित लोखंडे यांच्यात व्हॉट्‌सऍप ग्रुपमधील वर्चस्वावरून वाद सुरू होता. याशिवाय दोघांमध्ये जुने वादही होते. बुधवारी दुपारपासून यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. त्यानंतर बुधवारची घटना घडली. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे लोक रस्त्यावर आले. त्यापैकी काहींनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. ढगे आळीत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, संजय मोतेवार या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांची चौकशी सुरू असताना पोलिस उपअधीक्षक अजित टिके, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित नाकाबंदी करून तपासाची चक्रे फिरवली. सुरवातीला कोणी कोणावर गोळीबार केला, याची माहिती मिळत नव्हती. त्यानंतर या अनुषंगाने काहींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची माहिती उघडकीस आली.
 
दरम्यान याप्रकरणी दिलीप बाजीराव मोरे (रा.गंगापुरी, वाई) याने दिलेल्या तक्रारीनुसार अभिजित लोखंडे, विजय अंकुशी, अर्जुन यादव, सुनील जाधव, नितीन भोसले यांच्याविरोधात तर अर्जुन यादवने दिलेल्या तक्रारीनुसार अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव, सोन्या शिंदे, अभिजित मोरे व इतर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे व सहायक निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.
 
या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील बुधवारी रात्रीपासून वाईत तळ ठोकून आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अभिजित लोखंडे, अर्जुन ऊर्फ राणा यादव, विजय अंकुशी, नितीन भोसले, सुनील जाधव यांना अटक केली आहे. दुसऱ्या गटातील संशयित फरारी असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.

सातारा जिल्ह्यात एक रुग्ण वाढला; 78 जणांवर उपचार सुरु
 
सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने केवळ विषम तारेखस सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेतच चालू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com