पालक, सहपालकमंत्र्यांचा निघणार कस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

सातारा - शिवसेनेने विजय शिवतारे यांना पालकमंत्री, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सहपालकमंत्री पद देऊन साताऱ्यात पक्ष, संघटना वाढीची जबाबदारी दिली आहे; परंतु यापूर्वीच साताऱ्यात भक्‍कम असणारी राष्ट्रवादी, ताकद कायम राखण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेस, तर मुसंडी मारत राजकीय बळ वाढविणारे भाजप हेच जिल्हा परिषद निवडणुकीत प्रबळ पक्ष ठरत आहेत. पालकमंत्री, सहपालकमंत्री पदे असलेली शिवसेना, स्वाभिमानी संघटनेला मात्र दमदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिरकाव करताना पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांचा कस लागणार आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोमात आली आहे. गट, गणांमध्ये समीकरणाची जुळवाजुळव अंतिम टप्प्याला पोचली आहे. राज्यात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सत्ता आली असल्यामुळे राज्यात सर्वत्र पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पालकमंत्र्यांमार्फत हालचाली केल्या जातात. शिवसेनेने साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे दिले, तर त्यावर कोटी करण्यासाठी भाजपने स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना सहपालकमंत्रिपद दिले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादीला टक्‍कर देत शिवसेना आपली पाळेमुळे घट्ट करेल, असा आशावाद शिवसैनिकांना लागला होता. मंत्री शिवतारे आक्रमक असल्याने कार्यकर्तेही जोमात होते; परंतु पक्ष वाढीसाठी सूचक पावले न पडल्याने शिवसेना सध्या पक्षीय पातळीवर भाजपच्याही मागे पडली आहे. 

शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपालकमंत्री पदाची राबवणूक केली. त्यात स्वाभिमानीची धडाडती तोफ, आक्रमक नेते सदाभाऊ खोत यांची साताऱ्यासाठी नियुक्ती केली. धुरंधर राष्ट्रवादीपुढे ही आक्रमक जोडगोळी शिवसेना, स्वाभिमानी वाढविण्याची आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, स्वाभिमानीपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेच मुसंडी मारली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने सातारा दौरे करून राष्ट्रवादीची दुसरी फळी आपलीसी केली आहे. मात्र, हे करण्यात शिवसेना, स्वाभिमानीला पूर्णत: अपयश आलेले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना जिल्हा परिषदच्या सर्व जागांवर उमदेवारही देता आलेले नाहीत. 

एक काळ आंदोलनांचे रान पेटवून कार्यकर्त्याना चेतवणारी श्री. खोत यांची मुलखमैदानी तोफ निवडणुकीच्या तोंडावर संघटना वाढीसाठी धडाडताना दिसत नाही. उमेदवारच नाहीत तर कार्यकर्त्यांचे मोहळ कोठून निर्माण होणार, अशा द्वंद स्थितीत जिल्ह्यातील शिवसेना आणि स्वाभिमानी अडकली आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी स्वबळाचा नारा खणखणीतपणे वाजत असल्याने राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजपला रोखत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांत शिवसेना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोचविताना दोघांचाही कस लागणार आहे.

Web Title: satara zp election