खुल्या प्रवर्गावरील अन्याय दूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

सातारा - प्राथमिक शिक्षण विभागातील वर्षांनुवर्षे रखडलेल्या रोस्टरचा (बिंदूनामावली) प्रश्‍न जुलै २०१६ मध्ये अखेर मार्गस्थ झाला. परंतु, त्यामध्ये खुल्या वर्गात तब्बल ३४८ शिक्षक अतिरिक्‍त ठरले होते. त्याविरोधात फेरतपासणीसाठी अनेकांनी प्रयत्न केल्याने पुन्हा एकदा रोस्टर तपासणी पूर्ण झाली. त्यात अवघे सात शिक्षक जादा ठरले आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गावर भरतीमध्ये होणारा अन्याय दूर झाला. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक उपशिक्षकांचे रोस्टर पूर्ण नसल्याने परजिल्ह्यात कार्यरत असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना साताऱ्यात येता येत नव्हते. काही वर्षांतील प्रस्ताव, कागदपत्रे सापडत नसल्याने रोस्टर प्रक्रियाच अडचणीत आली होती. २०१६ मध्ये अनेक शिक्षक संघटनांनी आंदोलनासह निवेदनाचे मार्गही स्वीकारले होते. तसेच तत्कालीन अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीही रोस्टर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. जुलै २०१६ मध्ये आठ हजार ५८२ उपशिक्षकांची बिंदूनामावली तपासून रोस्टर अंतिम करण्यात आले होते. त्यातून २०४ पदे रिक्‍त असल्याची माहिती समोर आली. मात्र, खुल्या प्रवर्गातील ४८ टक्‍के पदांनुसार चार हजार ११९ उपशिक्षकपदांना मान्यता द्यावयाची असताना चार हजार ४६७ पदे भरली असल्याने ३४८ पदे जादा ठरल्याचे नमूद केले होते. परिणामी या खुल्या प्रवर्गांना भरतीमध्ये संधी मिळण्याची शक्‍यता कमी झाली होती. विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण सभापती राजेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी रोस्टर फेरतपासणीसाठी कार्यवाही केली. रोस्टर तपासणी नुकतीच पूर्ण झाली असून, त्यात खुल्या प्रवर्गातील केवळ सात पदे अतिरिक्‍त ठरली आहेत.

...ही कारणे
आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्ह्यातून परजिल्ह्यात उपशिक्षक गेले, काही सेवानिवृत्त झाले, तर काही मृत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील पदे कमी झाल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. कागदपत्रे सापडत नसल्याने इतर प्रवर्गातील उपशिक्षकांना खुल्या प्रवर्गात ढकलल्याने बिंदूनामावलीत खुल्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्‍त ठरले अशी चर्चा सुरू आहे. 

Web Title: satara zp injustice against the open category