कोल्हापूर दक्षिण विधानसभा सतेज पाटील लढवणार

कोल्हापूर दक्षिण विधानसभा सतेज पाटील लढवणार

कळंबा - विधानसभा निवडणूक मी स्वतः लढवणार असून, ज्यांनी आम्हाला फसवलं त्यांना लोकसभेला मदत करायची नाही. फसवणाऱ्याला सोडून मतदान करायचे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. पाचगाव (ता. करवीर) येथील क्रीडासंकुल आणि विविध विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

पाचगाव ग्रामपंचायतीच्या निधीतून केंद्रशाळा पाचगाव, क्रीडासंकुल, तसेच शिक्षक कॉलनी, शांतीनगर, गाडगीळ कॉलनी, विठ्ठल-रुक्‍मिणीनगर, भोगम कॉलनी, पालकर कॉर्नर, पोवार कॉलनी, शिवनेरी कॉलनी, नागेश्वर कॉलनी, भैरवनाथ कॉलनी येथील अंतर्गत रस्ते, गटारीसह विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी सरपंच संग्राम पाटील होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचा विकासनिधी खेचत बहुतांशी प्रश्न मार्गी लावले आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांत ‘अच्छे दिन’मुळे पाचगावाचा विकास रखडला आहे. ‘कोल्हापूर दक्षिण’मधील आमदार कुठे असतात? याचा पत्ता कुणालाही नाही. २० दिवसांत अपघाताने झालेले आमदार कुठे असतात? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. येत्या काळात जास्तीत जास्त विकासनिधी खेचून पाचगावात प्रलंबित मूलभूत प्रश्न मार्गी लावणार असून, सध्या मी सत्तेत नसल्याने ज्यादा निधी उपलब्ध करू शकत नाही. परंतु, माझ्याकडून किमान १५ लाखांचा निधी क्रीडा संकुलसाठी जाहीर करतो.’ 

ते म्हणाले, ‘विकासनिधी देताना शासनाकडून दुजाभाव होत असल्याने विकासकामांवर दूरगामी परिणाम होत आहे. पाचगावातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील आहेत.’

यावेळी नारायण गाडगीळ, शंकर पाटील, प्रकाश गाडगीळ, युवराज गवळी, संजय पाटील, संग्राम पोवाळकर, सुशांत शेडगे, मुख्याध्यापक शीतल रेडेकर, सागर दळवी, भाग्यश्री दळवी, दीपाली पाटील आदी उपस्थित होते.

पाचगावकरांचा लोकसभेला जय महाराष्ट्र
लोकसभेला काय करायचे असे पाचगावातील कार्यकर्ते आमदार सतेज पाटील यांच्याकडे विचारणा करत होते. यावर आमदार पाटील म्हणाले, आपल्याला ज्यांनी फसवलं, त्यांना सोडून मतदान करायचे. यावर लोकसभेला पाचगावकरांचा ‘जय महाराष्ट्र’ असे कार्यकर्ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com