खंजीर खुपसणारे म्हणतात, आता घरी येतो! - सतेज पाटील

खंजीर खुपसणारे म्हणतात, आता घरी येतो! - सतेज पाटील

कोल्हापूर - गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी काँग्रेस संपविण्याचे काम केले, तेच खासदार धनंजय महाडिक हे आता माझ्या घरी येतो म्हणतात; पण ज्यांनी आमचा विश्‍वासघात केला, आता त्यांना मदत करायची नाही, असा मी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगत खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी आज केला. यावर उपस्थितांनी एकमताने खंजीर खुपसणाऱ्यांना मदत करायची नाही, असे सांगितले. 

दरम्‍यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आदेश दिला तर आमदार सतेज पाटील यांच्‍या घरी जाऊन त्‍यांची भेट घेऊ, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले होते. त्‍यावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आयोजित परिवर्तन अभियानाचा सांगता कार्यक्रम जवाहरनगर येथे झाला. या वेळी आमदार पाटील बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांना मदत न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, की गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दबाव होता. त्यामुळे महाडिक यांना मदत केली. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाडिक आता घरी भेटण्यासाठी येतो, असे म्हणत आहेत. गेल्या वेळीही असेच झाले. ज्यांनी आमचा विश्‍वासघात केला, त्यांना मदत करायची नाही, हा आमचा निर्णय पक्का आहे. त्यामुळे काँग्रेसचा कोणत्याही कार्यकर्ता विश्‍वासघातकी लोकांना मदत करणार नाही, असा टोलाही खासदार महाडिक यांना आमदार पाटील यांनी लगावला. 

आमदार पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत आम्हाला काहीही अडचण येणार नाही. आम्ही त्याबाबत निश्‍चिंत आहेत. आमच्याबरोबर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे हे असतील. या सर्व मंडळींतर्फे आपापल्या ताकदीने काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणण्याचे काम केले जाणार आहे. मोदी लाट असतानाही २०१४-१५ मध्ये महापालिकेत २९ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले आहेत. 

आमच्याकडून काही चुका झाल्याही असतील. पण, विधानसभेला आता चुका होणार नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्राने काँग्रेसला ताकद दिली आहे. आता नव्याने ही ताकद उभी राहणार आहे. या वेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, धीरज देशमुख उपस्थित होते. 

पी. एन. पाटील, प्रकाश आवडे, जयवंतराव आवळेंसह आम्ही सर्व जण एकसंघपणे काम करणार आहोत. जिल्ह्यातून काँग्रेसचे किमान सहा आमदार घेऊनच विधानसभेत जाणार आहे. प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात जीव ओतून काम करणार आहे. 
- सतेज पाटील,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com