रक्त आटले तरी शासनाची मदत मिळेना

रक्त आटले तरी शासनाची मदत मिळेना

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या रुग्णालयाला शासन मदत करेल म्हणून पाठपुरावा केला; मात्र रक्त आटले तरी मदत मिळेना. आता आपल्यालाच आपले बघावे लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व इतर सुविधांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर सरिता मोरे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत  सोहळा झाला.

सावित्रीबाई रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना, तसेच इमारत नूतनीकरण व विद्युत संयंत्राचा लोकार्पण असा संयुक्त सोहळा आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. आमदार सतेज पाटील म्हणाले, 

‘‘नूतनीकरणानंतर रुग्णालय खासगी रुग्णालयांच्या तोडीचे झाले आहे. लिफ्ट, स्कॅनिंग मशीन यासह अन्य सुविधांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व शासनाकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे पालिकेला पुढाकार घ्यावा लागेल. लिफ्टसाठी दिव्यांगांचा निधी वापरल्यास सर्वसामान्य नागरिकांनाही फायदा होईल. तसेच रुग्णालयात प्रत्येकी एक मर्च्युरी फ्रीजरसह डॉक्‍टर व रुग्णाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागले. महापौर सरिता मोरे यांनी नवीन सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर भूपाल शेटे यांनी रुग्णालयाला कायमस्वरूपी कर्मचारी मिळण्यासाठी प्रयत्न  करू, असे सांगितले.
आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी प्रास्ताविकात सुविधांची माहिती दिली.

नगरसेवक जयंत पाटील, संदीप नेजदार, सत्यजित कदम, अशोक जाधव, सचिन पाटील, अभिजित चव्हाण, नियाज खान, सुरेखा शहा, सूरमंजिरी लाटकर, अश्‍विनी बारामते आदींसह माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

दोन महिने वाट पाहू
रुग्णालयात सुविधा मिळवण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. विशेषतः सीटी स्कॅन मशीन व एनआयसीयुसाठी निधी मिळणे गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दोनेक महिने वाट पाहू त्यानंतरही मदत न मिळाल्यास पर्याय निवडू असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com