सतेज पाटलांचा ‘दक्षिणे’त शड्डू

सदानंद पाटील
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी (ता. १७) मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना जिवाचे रान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही पाटील यांना विधानसभेवर पाठवण्याचा विडा उचलला आहे. मागील चार वर्षांत राजकीय पटलावर अनेक उलटसुलट घडामोडी घडल्या असून, त्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत उमटणार आहेत. यावेळीही पाटील यांचे टार्गेट महाडिकच असल्याचे स्पष्ट झाल्याने या निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे. 

मागील सरकारमध्ये आमदार सतेज पाटील यांना गृह राज्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पाटील यांची ओळख ‘शॅडो’ मुख्यमंत्री अशी होती. त्यामुळे पाटील यांची मंत्रिमंडळातील ताकत चांगलीच वाढली. या ताकतीच्या जोशात आमदार पाटील यांनी काही चुकाही केल्या. आवश्‍यकता नसताना फाडलेली टोलची पावती, शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील भूमिका, जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अमल महाडिक यांना ठरवून डावलणे या बाबी विधानसभेला अडचणीच्या ठरल्या. 

भाजपनेही आमदार सतेज पाटील यांना टक्‍कर देण्यासाठी नवख्या आणि शांत स्वभावाच्या अमल महाडिक यांना उमेदवारी दिली. महाडिक यांना उमेदवारी देण्यामागे अनेक कारणं असली तरी जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक डावलल्याने आमदार पाटील यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याचाही हेतू होता. तर उमेदवार पुत्रासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, तसेच खासदार महाडिक यांनी लावलेल्या जोडण्याही उपयोगी ठरल्या. परिणामी, पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले, हे चित्र मागील निवडणुकीत पाहायला मिळाले. मागील निवडणुकीत पाटील यांना शहरी मतदारांचा फटका जादा बसला. 

पाटील यांनी पराभवानंतर पुन्हा एकदा मोट बांधत विधानपरिषद निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची सहानुभूती आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या पाठबळामुळे महादेवराव महाडिक यांचा पराभव करून त्यांनी उट्टे काढले.

वेगळी रणनीती
सतेज पाटील यांची विधानपरिषदेची आमदारकी २०२२ सालापर्यंत आहे. तरीही त्यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. त्यांची यामागची रणनीती वेगळी आहे. राज्यातील काँग्रेस पक्षाकडे असलेल्या युवा नेतृत्वात आमदार सतेज पाटील यांचे स्थान पहिल्या फळीतील आहे. दिल्लीपर्यंत पक्षातील विविध नेत्यांशी असलेला त्यांचा संपर्क, अनुभव, वक्तृत्व या जोरावर ते राज्याच्या सत्तेत केंद्रस्थानी राहू शकतात, याचा अंदाज असल्याने त्यांनी विधानसभेला शड्डू ठोकला आहे.

Web Title: Satej Patil Vidhansabha Election Politics