हेर्लेतील मूकबधिर वृषभ, सौरभच्या जिद्दीची कथा

हेर्लेतील मूकबधिर वृषभ, सौरभच्या जिद्दीची कथा

कोल्हापूर - बोलणाऱ्यांच्या एरंड्या खपतात; पण न बोलणाऱ्यांचे सोनेही खपत नाही, अशी एक म्हण आहे; पण या दोघांनी ही म्हण खोटी ठरवली आहे. कारण तसेच आहे. हे दोन्ही मुके व बहिरे आहेत; पण दोघे केस कापण्याचा व्यवसाय करत आहेत. केस कापण्याचा व्यवसाय आणि तो ही न बोलता यांनी करून दाखवला आहे. हे बोलत नाहीत. त्यामुळे खुर्चीवर खाली मान घालून बसलेले गिऱ्हाईक बोलत नाही. केवळ खाणाखुणांवर त्यांची कंगवा-कात्री चालते, आणि कचाकचा चालणाऱ्या कात्रीच्या लयदार आवाजाचीच काय ती या दुकानात साथसंगत असते. 

सौरभ व वृषभ या दोन मुक्‍या, बहिऱ्या तरुणांच्या जिद्दीची ही कथा आहे. हे दोघे हातकणंगले तालुक्‍यातील हेर्ले गावचे. वडील साखर कारखान्यात नोकरीला. या दोन्ही मुक्‍या, बहिऱ्या तरुण मुलांच्या भवितव्याची त्यांना चिंता लागून राहिली होती. ते जातीने नाभिक. त्यामुळे या दोघा मुलांनी आम्ही केस कापण्याचा पारंपरिक व्यवसाय करतो, असे वडिलांना खाणाखुणावरून सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्यवसाय हे दोघे मुके, बहिरे कसे करू शकतील, ही शंका त्यांना टोचत होती. मग ते या दोघांना घेऊन कोल्हापुरात सयाजी झुंजार यांच्या सयाजी ॲकॅडमीमध्ये आले व या दोघांना केस कापण्याचे प्रशिक्षण देण्याची विनंती केली. झुंजार यांनीही ही काहीशी अवघड जबाबदारी स्वीकारली; पण दोघांना झुंजार यांच्या बोलतानाच्या ओठाच्या हालचालीवरून जरूर ती माहिती आत्मसात केली व हेर्ले येथे चारच दिवसांपूर्वी दुकानाची सुरवात केली.

या दुकानात ग्राहकांची गर्दी आहे; पण केशकर्तनालय म्हणजे गप्पाटप्पा मारत बसण्याचे ठिकाण ही ओळख या दोघांनी पुसून टाकली आहे. त्यांना हेर्लेतील तरुणांनी खूप चांगली साथ दिली आहे. आपण सांगणार एक, हे करणार दुसरेच आणि आपल्या केसाची स्टाईल बिघडणार, ही भीती तरुणांनी बाजूला ठेवली आहे. केस कसे कापायचे, हे त्यांना खाणाखुणा करून सांगतात आणि त्या  खाणाखुणा ध्यानात ठेवून हे दोघे केस कापतात. केस कापून झाले, की गिऱ्हाईक आणि हे दोघे एकमेकांकडून बघून फक्त मंद हसतात. आणि ‘ओ के भावा’ असे समाधानाचे भाव जणू व्यक्त करतात. दुकान काही दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. तरीही गिऱ्हाईकांची चांगली ये-जा आहे. वृषभ आणि सौरभ दोघेही खूश आहेत. पोरांच्या चेहऱ्यावरची ही खुशी पाहून त्यांचे वडील चंद्रकांत खूश आहेत. न बोलताही सुख समाधान कसे अनुभवता येते, याचेच हे उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com