सांगलीचे पक्षिवैभव जपुया...चला पक्षी वाचवुया..! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सांगली - दरवर्षी महापालिका क्षेत्रातील विविध उद्यानांमधील झाडांवर प्रजनन होणाऱ्या पक्ष्यांपैकी चार-पाचशे पक्षांचे प्राणिमित्रांकडून संगोपन करून पुन्हा निसर्गात सोडले जाते. यंदा ही मोहीम अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने तसेच पक्षी संख्या वाढावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने विशेष मोहीम सुरू होत आहे. शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महापालिका, वनविभाग आणि सकाळ माध्यमसमूहाच्या वतीने या मोहिमेसाठी पुढकार घेण्यात आला आहे. याबाबत आज "सकाळ'च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या मोहिमेचा पुढील सहा महिन्यांचा कृती कार्यक्रम ठरला. 

सांगली - दरवर्षी महापालिका क्षेत्रातील विविध उद्यानांमधील झाडांवर प्रजनन होणाऱ्या पक्ष्यांपैकी चार-पाचशे पक्षांचे प्राणिमित्रांकडून संगोपन करून पुन्हा निसर्गात सोडले जाते. यंदा ही मोहीम अधिक व्यापक करण्याच्यादृष्टीने तसेच पक्षी संख्या वाढावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने विशेष मोहीम सुरू होत आहे. शहरातील विविध पक्षी-प्राणिप्रेमी संघटना, महापालिका, वनविभाग आणि सकाळ माध्यमसमूहाच्या वतीने या मोहिमेसाठी पुढकार घेण्यात आला आहे. याबाबत आज "सकाळ'च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या मोहिमेचा पुढील सहा महिन्यांचा कृती कार्यक्रम ठरला. 

दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीपासून पक्षी प्रजननासाठी शहरातील विविध उद्यानात आश्रय घेतात. मार्च एप्रिलपासून वेण सुरू होते. हळूहळू पिलं घरट्याबाहेर डोकावतात. कधीकधी बागडता बागडता खाली पडतात. थेट 25-30 फूट खाली ती जमिनीवर आदळतात. बहुतांश वेळा ती जीवाला मुकतात किंवा त्यांना पुन्हा आकाशी झेपावण्याचे बळ काही त्यांच्या पंखात येत नाही. त्यांना सावरणारे पक्षी मित्रांचे हातही कधीकधी अपुरे ठरतात. दरवर्षी ही मंडळी आपल्या परीने या कामी पुढाकार घेऊन या पक्ष्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात. यंदा हे प्रयत्न अधिक ठोस करण्यासाठी आज "सकाळ'च्या कार्यालयात बैठक झाली. या मोहिमेची सुरवात येत्या 20 मार्चला जागतिक चिमणी दिनानिमित्त येथील शास्त्री उद्यानात सुरवात होईल. 

या बैठकीस आयुक्त रवींद्र खेबुडकर, नगरेसवक शेखर माने, सांगलीचे वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी, ऍनिमल सहारा फाऊंडेशनचे अजित काशीद, बर्ड सॉंग्स्‌चे संजय पोंक्षे, खोपा बर्ड हाऊसचे सचिन शिंगारे, ऍनिमल राहतचे किरण नाईक, शशिकर भारद्वाज, रोहित कटारे उपस्थित होते. 

व्यापक मोहीमच का..? 
पुढील महिन्यात पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू होईल. सांगलीली तिन्ही बाजूने नदीकाठ असल्याने 125 वर पक्ष्यांच्या जाती इथे विसावण्यासाठी येतात. नदीकाठी शिकारी पक्ष्यांची घरटी असल्याने बहुतांश पक्षी अन्यत्र घरटी बांधतात. येथील शास्त्री उद्यानात पाणकावळा, बगळा यांची शेकडो घरटी बांधली जातात. सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. इवल्या इवल्या घरट्यात पक्ष्यांची चाललेली दंगामस्ती उद्यानात येणाऱ्यांना खुणावते. एक प्रसन्न वातावरण उद्यानात दिसून येते. मात्र ती चिमुकली पिलं खेळता, बागडता अचानक तीस फुटांवरून खाली जमिनीवर आदळतात. चिमुकल्यांच्या पंखात अजूनही बळ नसल्यामुळे हा अपघात होतो. त्यात दररोज अनेक चिमुकल्या पक्ष्यांचा जीव जातो, तर अनेक पक्षी जखमी होतात. त्या जखमी पक्ष्यांना सावरण्यासाठी पक्षिमित्र अजित काशीद, सचिन शिंगारेसह अनेक जण पुढाकार घेतात. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत पाचशेंवर पक्ष्यांना जीवदान देण्यात आले. मात्र, उर्वरित 80 टक्के पक्ष्यांचा उपचाराविना जीव जातो. यासाठी यंदाच्या हंगामात पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी व्यापक मोहीम उभारणे गरजेचे आहे. 

बैठकीतील निर्णय 
* जागतिक चिमणी दिनानिमित्त 20 मार्चला मोहिमेला प्रारंभ 
* महापालिकेकडून पक्ष्यांसाठी शेडनेटची व्यवस्था 
* नगरसेवक शेखर माने यांच्याकडून खाद्य आणि औषधोपचारची व्यवस्था 
* वनविभागाकडून जखमी पक्षी ठेवण्यासाठी मोठे पिंजरे 
* पक्षिमित्र संघटना, ऍनिमल राहतसह अन्य संस्थांचा प्रत्यक्ष कामात सहभाग 
* पक्ष्यांबाबत जनजागृतीचा भाग म्हणून शाळांमध्ये होणार व्याख्याने-स्लाईट शो 
* महापालिकांच्या सर्व इमारतींमध्ये लावणार पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी "खोपा' 
* खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण करताना पक्ष्यांसाठी उपयुक्त जातींची निवड करणार. 

नागरिकहो.. आपण हे करा 
जखमी पक्ष्यांबाबत तातडीने पक्षिमित्रांना कळवा 
परिसरात पक्ष्यांसाठी खाद्य व पाण्याची सोय करा. 
पक्ष्यांसाठी बंगला, फ्लॅटमध्ये कृत्रिम खोपे तयार करून लावा 
चिमणी गणना उपक्रमात सहभागी व्हा 
आपल्या सहभागाचे स्वरूप या क्रमांकावर वॉटस्‌अप (9146095500) कळवा 

पक्षिमित्रांच्या प्रयत्नांना महापालिकेच संपूर्ण सहकार्य असेल. शास्त्री उद्यान पक्षांसाठी शुश्रूषा केंद्र सुरू करू. महापालिकेच्यावतीने येथे आवश्‍यक अशी जाळीही उपलब्ध करून देऊ. मोकळ्या जागांमध्ये पक्ष्यांना पूरक असे वृक्ष लावू. नागरिकांच्या सहभागाने ही मोहीम यशस्वी करू.'' 
रवींद्र खेबुडकर, आयुक्त महापालिका 

""पक्षिमित्रांचे जखमी पक्ष्यांवर उपचाराचे काम कौतुकास्पद आहे. पालिकेच्या पक्षी शुश्रूषा केंद्राला औषधोपचार आणि आवश्‍यक खाद्याचा खर्च वैयक्तिकरीत्या करू. शहराचे पक्षिवैभव ही ओळख व्हावी यासाठी नागरिकांच्या सहभागाने विविध उपक्रमांची योजना आहे.'' 
शेखर माने, नगरसेवक 

""वनविभागातर्फे शुश्रूषा केंद्राला पिंजरे तसेच रक्षक कर्मचारी दिले जातील. महापालिच्या सहभागाने आम्ही शहरात व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवणार आहोत.'' 
अनिल निंबाळकर, वनक्षेत्रपाल सांगली.

Web Title: save bird