सावित्रीबाई, 'पंचगंगे'ला स्त्रीरोग तज्ज्ञांची कमतरता

डॅनियल काळे
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

दोन डॉक्‍टरांवरच सेवेचा भार; अपुऱ्या साधनसामग्रीच्या जोरावर ही रुग्णालये सुरू
कोल्हापूर - महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालय आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये सध्या स्त्रीरोग तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या डॉक्‍टरांवरच सेवेचा भार पडत आहे, तर रात्री अपरात्री प्रसूतीसाठी मातांना आणि जोखीम असणाऱ्या गरोदर मातांना सीपीआरकडे पाठवावे लागत आहे. अपुरे डॉक्‍टर आणि अपुऱ्या साधनसामग्रीच्या जोरावर ही रुग्णालये सुरू आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्कॅनर आहे, परंतु रेडिओलॉजिस्ट नसल्याने ते पडून आहे.

सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड म्हणून महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, पंचगंगा आणि आयसोलेशन रुग्णालयाकडे पाहिले जाते. या तिन्ही रुग्णालयांची ख्याती जिल्हाभर आहे. सध्या सर्व रुग्णालयांत डॉक्‍टरांची आणि विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञांची कमतरता भासत आहेत. सध्या येथे चार स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज आहे, परंतु तेथे प्रत्यक्षात दोनच तज्ज्ञ आहेत. आणखी दोन स्त्रीरोग तज्ज्ञ मिळाले तर ही रुग्णालये चांगली सेवा देण्यासाठी सज्ज राहतील. तसेच चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही येथे आवश्‍यकता आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या साथीला वैद्यकीय अधिकारी असतील तर रुग्णालयात चांगली सेवा मिळेल. सावित्रीबाई फुले रुग्णालयात "सीपीएस कॉलेज' सुरू केले तरीदेखील वैद्यकीय अधिकारी मिळू शकतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतीत लक्ष घालायला हवे.

एकाच ठिकाणी प्रसूती व्हाव्यात
सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा ही जनरल हॉस्पिटल आहेत. तेथे मोठ्याप्रमाणात बाळंतपणे होतात. तसेच कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाही होतात.

गरोदर महिलांची इमर्जन्सी असते. तत्काळ उपचार मिळणे गरजेचे असते. जोखीम असणाऱ्या गरोदर माता असतात. त्यांच्यासाठी येथे
अल्ट्रा सोनोग्राफी, व्हेन्टीलेटर आणि अतिदक्षता विभाग अशा सुविधा असणे गरजेचे आहे; पण या सुविधा तेथे नसल्याने रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवावे लागते. यामध्ये बराच वेळ निघून जात असल्याने एखाद्या महिलेचा जीवही धोक्‍यात येतो. पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले ही रुग्णालये बाळंतपणासाठी चालविण्याचा अट्टाहास सोडून महापालिकेने एकाच सावित्रीबाई फुले रुग्णालयात बाळंतपणे केली तर चांगली सेवा देता येईल. स्त्रीरोग तज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध राहतील, त्यांच्या जोडीला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील, असा एक पर्याय तज्ज्ञांच्या चर्चेतून पुढे आला आहे. त्यावरही निर्णय हवा.

Web Title: Savitribai, pancagangela gynecology experts poverty