सायलीच्या संकल्पनेतून साकारली अक्षय कुमारची जाहिरात

तात्या लांडगे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कुटुंबाचा विचार न करता स्वत: चा जीव धोक्‍यात घालत वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या मधूनच अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेट नाही, मोबाईलवर बोलत-बोलत वाहन चालविणे, अचानकच रस्त्यात वाहन उभा करणे, सिटबेल्ट न घालता वाहन चालविणे, असे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असून ते कमी करण्याकरिता आम्ही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे अभियान सुरू केले आहे. जेणेकरून अपघाती मृत्यू कमी होतील, अशी आशा आहे. 
- सायली कुलकर्णी

सोलापूर : सरकारने अपघात रोखण्याकरिता वाहतूक कायदे व नियम करूनही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नियम धाब्यावर बसवून जणू काय स्वत:च्या बापाचाच रस्ता असल्यासारखे अनेकजण वाहन चालवितात. वाढते अपघात रोखण्याकरिता आणि वाहनचालकांना स्वंयशिस्त लागावी या उद्देशाने मूळची सोलापूरची असलेल्या सायली कुलकर्णी हिने तिच्या तीन साथीदारांच्या संकल्पनेतून सिनेअभिनेता अक्षयकुमार यांच्या सहकार्यातून रोड किसी के बाप का नही, हे अभियान राज्यभर राबविण्यास सुरू केले आहे. 

सायली ही मूळची सोलापूरची असून रघुनाथ कुलकर्णी हे तिचे वडील तर श्रीकांत कुलकर्णी व हेमंत कुलकर्णी तिचे काका आहेत. मुंबई मध्ये सायलीने पत्रकारितेची पदवी घेतली असून आता ती जाहिरात विभागात काम करत आहे. केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भरत दाभोळकर, किरण वेरणेकर, दिव्या राधाकृष्णन आणि सायली कुलकर्णी यांच्या टीमने सिनेअभिनेता अक्षयकुमार यांच्यासमवेत ठिकठिकाणी वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे व्हिडिओ तयार केले आहेत. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमेवत या टीमने सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सडक सुरक्षा, जीवन रक्षा या अभियानाच्या माध्यमातून वाहतुकीबाबत जनजागृती केली जात आहे. 

सिनेअभिनेता अक्षयकुमार यांचे योगदान 
हेल्मेटविना दुचाकी चालविणे, नो एन्ट्रीतून गाडी चालविणे, सीट बेल्टविना वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करणे यासह अन्य बाबींवर सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी व्हिडिओंच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये जागृती केली आहे. 

कुटुंबाचा विचार न करता स्वत: चा जीव धोक्‍यात घालत वेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या मधूनच अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेट नाही, मोबाईलवर बोलत-बोलत वाहन चालविणे, अचानकच रस्त्यात वाहन उभा करणे, सिटबेल्ट न घालता वाहन चालविणे, असे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत असून ते कमी करण्याकरिता आम्ही केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हे अभियान सुरू केले आहे. जेणेकरून अपघाती मृत्यू कमी होतील, अशी आशा आहे. 
- सायली कुलकर्णी

Web Title: Sayali Kulkarni create advertise to traffic awareness