शाळा प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर 

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सातारा - जिल्ह्यातील बहुतांश खासगी शैक्षणिक संस्थांनी शासकीय नियमांची पायमल्ली करून शाळा प्रवेशप्रक्रिया राबविली. पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी "सकाळ'ने आवाज उठविला. "पीआरसी'च्या धांदलीतही त्याची दखल घेत अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने दोन मे पासूनचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. आता पूर्वीचे प्रवेश रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात येईल. 

प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच खासगी शाळांनी विशेषत- इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळा प्रवेशाची प्रक्रिया राबविली. इच्छित शाळेत प्रवेशासाठी पालकांनीही रांगा लावून प्रवेश अर्ज घेतले. ही बेकायदेशीर प्रक्रिया "सकाळ'ने उजेडात आणली. त्यानंतर शहरातील दोन शाळांनी स्वत-हून पुढाकार घेत प्रवेशप्रक्रिया थांबवली. सीबीएसई व राज्य शासनाची मान्यता असताना परंतु जिल्हा परिषदेच्या मान्यतेपूर्वीच नव्याने सुरू झालेल्या शहरातील एका शाळेने वर्गही सुरू केला. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण विभागाने वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीचे सर्व प्रवेश रद्द करण्याची सूचना शाळा प्रशासनाला दिल्या आहेत. येत्या दोन मेपासून शाळा प्रवेशप्रक्रिया राबवावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

शिक्षण विभागाच्या आदेशांना खासगी संस्था अनेकदा केराची टोपली दाखवतात. तरीही गटशिक्षणाधिकारी स्तरावर गुळमुळीत कारभार दिसतो. आता नव्याने काढलेल्या आदेशाचे पालन होते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर असल्याने पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ नये, याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेण्याची गरज आहे. 

"मिशन ऍडमिशन'चे वेळापत्रक 
- प्रवेश अर्ज वितरण व स्वीकारणे - दोन ते 16 मे 
- अर्ज स्वीकारणे - 17 ते 22 मे 
- अर्जांची छाननी व आरक्षणानुसार याद्या लावणे - 23 ते 26 मे 
- आरक्षणानुसार पालकांच्या समक्ष सोडत काढणे - 28 मे ते पाच जून 
- सोडतीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी लावणे - सहा ते सात जून 
- विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देणे (सायंकाळी पाचपर्यंत) - आठ ते 12 जून 
- प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयास देणे - 13 ते 14 जून 

Web Title: school admission schedule is finally announced