#SchoolBagsWeight नियमाने नव्हे; तारतम्याने निर्णय घ्या !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने दप्तराचे ओझे कमी करण्याच्या नियमावलीबरोबरच पहिली आणि दुसरीच्या मुलांना गृहपाठ देता येणार नाही असेही जाहीर केले आहे. या आदेशाबद्दल या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ जाणकारांची मत-मतांतरे.

मुलांवर गृहपाठाचे दडपण येणार नाही इतकी दक्षता शिक्षकांनी घेतली पाहिजे. मात्र गृहपाठच नको हे मात्र योग्य नाही. मुलांना अभ्यासाची सवय हळूहळू लावावी लागते. पहिली दुसरीचे प्रत्यक्ष अध्यापनाचे तास अवघे दोन ते तीन तासच असतात. बाकीचा कालावधी खेळ-मनोरंजनाचा असतो. त्यामुळे मुल घरी गेल्यानंतर पालकांनी त्याचा तासाभराचा अभ्यास करवून घेतला पाहिजे. पालक आणि शिक्षक दोघांनी समन्वयाने मुलाला ते वळण लावले पाहिजे. गृहपाठच नसेल तर मूल दुसऱ्या दिवशी थेट शाळेला आल्यानंतरच दप्तराला हात लावेल हे योग्य ठरणार नाही.
- स्मितांजली जाधव

मुख्याध्यापक, डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर

पहिली दुसरी नव्हे तर सर्वच इयत्ता स्तरावर गृहपाठाचा चुकीचा अर्थ घेतला गेलाय. त्याने अनेक प्रश्‍न निर्माण झालेत. गृहपाठाचा हेतू अभ्यासाची मानसिकता तयार करणे आहे. आपण केवळ ‘उतरवून काढणे’ असा त्याचा अर्थ घेतला. त्यामुळे मी एवढे लिहून काढले तरी माझा गृहपाठ झालाच नाही म्हणत मुलं ताणाखाली जातात. त्यासाठी आधी कॉपी कट पद्धती बदलली पाहिजे. शैक्षणिक पद्धतीत सुधारणांची गरज आहे. आपण  वरकरणी बदलांकडे अधिक लक्ष देत आहोत. त्यामुळे असे शासन आदेश निघतात आणि अधिक गोंधळ वाढतो.
- प्रा. रेवती हातकणंगलेकर, 

शिक्षण क्षेत्रातील जाणकार

गृहपाठाचा मुलांवर तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. मात्र गृहपाठ मुलांच्या विकासाचे एक साधन आहे हे  आधी लक्षात घेतले पाहिजे. एखादे मूल गृहपाठ करीत नसेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. गृहपाठ घेतल्याने काय नुकसान होते याचाही आधी  विचार केला पाहिजे. आपण सरसकट एखादा नियम करण्याच्या भानगडीत पडणे टाळले पाहिजे. गृहपाठ शिक्षण प्रक्रियेतील तो एक भाग आहे. पालकांसह शिक्षणाशी संबंधित सर्वच घटकांनी ते तारतम्याने घेतले पाहिजे.
- डॉ.चंद्रशेखर हळींगळे

मानसोपचार तज्ज्ञ

शाळांमध्ये खूप काही करवून घेतले जात असताना पुन्हा पहिली दुसरीच्या मुलांना गृहपाठ कशासाठी हे मान्यच. मात्र हे पालकांना समजून सांगणे महामुश्‍कील.  गृहपाठातलं डाँकी वर्क थांबवणे गरजेचे आहे. एक पालकांनी अन्य एका शाळेत मुलांना हजारपर्यंत आकडे लिहून घेतले जातात असं सांगत हे आपल्याकडे का नाही असे विचारले. आता त्यांना मी कसं समजून सांगू की. हा अभ्यास नव्हे. पालकांचा आग्रह मोठा असतो. शाळांना माघार घ्यावी लागते. पालकांच्या प्रबोधनाची मोठी गरज आहे.
- कपिल राजपूत

संचालक, राजपूत इंग्लिश मीडिअम स्कूल

Web Title: School Bags Weight issue