निम्म्या शाळांत पोषण आहार उसनवारीवर

School Food
School Food

कोल्हापूर - शालेय पोषण आहारासाठी धान्य व पूरक आहार पुरवठा करणाऱ्या ठेक्‍याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील पोषण आहार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. अपवाद वगळता दीड  हजारांवर शाळांत असे चित्र आहे. शासनाकडून धान्य पुरवठ्याबाबत आदेश निघाले आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्याप धान्य व पूरक आहार पुरवठा सक्षमपणे होत नाही. परिणामी जिल्ह्यातील ७० ते ८० हजार विद्यार्थ्यांचा आहार बेभरवशी झाला आहे.

विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, शाळा शिकण्याची इच्छा टिकून राहावी, शाळेची गोडी वाढावी अशा बहुविध उद्देशाने पोषण आहार योजना राबविली. 

केंद्र सरकारचे ६०, तर राज्य सरकारच्या ४० टक्के अनुदानातून योजनेचा खर्च भागविला जातो. त्यासाठी ठेकेदार नियुक्त केला होता. त्याच्या ठेक्‍याची मुदत जानेवारीत संपली. त्यामुळे बहुतांशी शाळांना पुढे धान्य अथवा पूरक आहार मिळणे मुश्‍कील झाले. आहार बनविण्याचा ठेका बचत गटांना दिला आहे. स्वयंपाकी व मदतनिसाकडून दररोज स्वयंपाक करून मुलांना वाढणे अशी कामे केली जातात.

ठेकेदाराकडून धान्य व पूरक आहाराचा पुरवठा महिनाभरापासून अनियमित झाला. त्यामुळे दररोज आहार कसा द्यायचा असा प्रश्‍न आहे, यातही चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा अशा डोंगरी तालुक्‍यात विशेष अडचणी निर्माण झाल्या. पर्याय म्हणून काही  बचत गट व पोषण आहारवाल्यांनी खासगी दुकानातून उधारीवर साहित्य घेतले.

महिन्याभरापासून पोषण आहाराचे नियोजन विस्कळित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुलांना शिक्षणाबरोबर सकस आहार मिळणे महत्त्वाचे आहे. त्यात अनियमितता होत आहे. डोंगरी तालुक्‍यांत स्थिती गंभीर आहे. आहारातील धान्य व पूरक आहाराचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेला पत्र मिळाले आहे. निविदा प्रक्रिया होऊन पंधरा दिवसांत धान्य व पूरक आहार पुरवठा सुरू होईल.
- प्राचार्य ए. बी. पाटील, अध्यक्ष, शालेय पोषण आहार कामगार संघटना

दृष्टिक्षेपात 
पोषण आहाराच्या शाळा ३,०५२ 
पोषण आहार देणारे कामगार ३,५००
११२ हून अधिक बचत गटांना काम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com