पुन्हा झाली घंटा, पुन्हा भरले वर्ग...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कोल्हापूर - हसत-खेळत शाळेचा पहिला दिवस अनुभवताना विद्यार्थ्यांनी आज अध्ययनास सुरुवात केली. मित्र-मैत्रिणींना भेटत बेंचवर बसण्याची चढाओढ त्यांच्यात दिसून आली. ‘गुड मॉर्निंग सर,’ ‘गुड मॉर्निंग मॅडम’ असे म्हणत वर्गात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. प्रार्थनेच्या सुरांनी शाळांचे प्रांगण भक्तिमय झाले, तर विद्यार्थ्यांना सोडण्यास आलेल्या पालकांच्या गर्दीने शाळांचा परिसरही फुलून गेला. 

कोल्हापूर - हसत-खेळत शाळेचा पहिला दिवस अनुभवताना विद्यार्थ्यांनी आज अध्ययनास सुरुवात केली. मित्र-मैत्रिणींना भेटत बेंचवर बसण्याची चढाओढ त्यांच्यात दिसून आली. ‘गुड मॉर्निंग सर,’ ‘गुड मॉर्निंग मॅडम’ असे म्हणत वर्गात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. प्रार्थनेच्या सुरांनी शाळांचे प्रांगण भक्तिमय झाले, तर विद्यार्थ्यांना सोडण्यास आलेल्या पालकांच्या गर्दीने शाळांचा परिसरही फुलून गेला. 
उन्हाळी सुटीत धम्माल करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज शाळेकडे पावले वळली. आई-वडिलांच्या बोटाला पकडून शाळेच्या पायऱ्या चढताना काहींचे चेहरे आनंदित होते. पहिलीच्या वर्गात रडव्या चेहऱ्याने आलेल्यांचे मित्र-मैत्रिणी भेटताच चेहरे प्रफुल्लित झाले. पहिलीतील विद्यार्थ्यांचे शिक्षक-शिक्षिकांनी गुलाब, फुगे देऊन स्वागत केले. बडबड गीते गात त्यांचे मनोरंजन करण्यात आले. टेंबलाईवाडी विद्यालयात पहिलीच्या विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या इमारतीत रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. वीर कक्कया विद्यालयातर्फेही बैलगाडीसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिकी माऊस मिरवणुकीत आकर्षण ठरला. पहिलीतील विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ देण्यात आला. दुपारच्या सुटीत विद्यार्थ्यांनी सामूहिक डबे खात फुटबॉल, क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. 

दरम्‍यान, मनपा वीर कक्कय विद्यालयामध्ये आज शाळेचा पाहिला दिवस विविध उपक्रमांनी झाला. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प पाठ्यपुस्तके, गणवेश दप्तर खाऊ देऊन करण्यात आले. यावेळी आणलेला मिकी माऊस मुलांना आकर्षित करणारा ठरला. शिवाय मुलांना बैलगाडीची सफर घडविण्यात आली.

सलग चार वर्षे शाळेचा पट वाढतो आहे. पहिलीत शंभरावर विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. शाळेची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे यंदा शाळा दोन शिफ्टमध्ये सुरू होत आहे. शाळेचा पट साधारणपणे साडेसातशे झाला आहे. शाळेला चांगले दिवस आले आहेत. 
- विलास पिंगळे (मुख्याध्यापक, टेंबलाईवाडी विद्यालय)

डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरात मी शिकले. माझी आजी, आई, मावशी शिक्षिकाच. त्यामुळे शाळेविषयी आम्हाला विशेष ओढ होती. शाळेत असताना पहिला दिवस आमच्यासाठी खास असायचा. शाळेतील प्रेमळ शिक्षकांमुळे आम्ही पहिला दिवस चुकवत नव्हतो. 
- सुप्रिया देशपांडे (मुख्याध्यापिका, शेलाजी वनाजी संघवी विद्यालय)

चिक्कोडीतील एस. एस. ई. एस. हायस्कूलमध्ये मी शिकलो. शाळेच्या पहिल्या दिवशी आतासारखे स्वागत केले जात नव्हते. मात्र, गणवेशात हजर राहणे सक्तीचे होते. वर्गात मित्र भेटल्यानंतर पहिला दिवस आनंदात जायचा. 
- आनंद मालवाडे (रा. उचगाव)

मुंबईतील कराची हायस्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. पहिला दिवस फारसा आठवत नाही. मात्र, मधल्या सुटीत चिंचा, बोरं खाण्यात आम्हाला मजा यायची. वर्गात दंगा-मस्ती करत होतोच; पण शिक्षकांविषयी तितकाच आदरही होता व आजही आहे. 
- प्रीती प्रितम पवार (रा. प्रतिभानगर)

Web Title: school start kolhapur student