मायणीत पर्यावऱणपुरक श्रावणी सहल

mayani school trip
mayani school trip

मायणी-  काळ्याशार ढगांनी अंधारुन जाणारा आसमंत अधुनमधुन येणारी पावसाची हलकी सर आणि हलकेच भिजलेल्या अंगाला हवेहवेसे वाटणारे ऊबदार ऊन. असा ऊन पावसाचा खेळ रंगात आला असतानाच त्याचा मनमुराद आनंद लुटत येथील भारतमाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रावणी सहलीच्या दरम्यान दोन हजार सीडबाॅलचे रोपण केले. पर्यावरणपुरक सहलीचा त्यांनी गिरवलेला धडा निश्तिचत इतरांसाठी आदर्शवत असाच आहे. 

शालेय जीवनात विविध अडचणींमुळे सर्वच विद्यार्थ्यांना शेकडो रुपये भरुन शैक्षणिक सहलीस जाता येत नाही. त्यासाठीच छोट्या, श्रावणी सहली, निसर्गवास, वनभोजनाचे आयोजन शाळांमार्फत कऱण्यात येते. मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील भारतमाता विद्यालयानेही अशा छोट्या श्रावणी सहलीचे आयोजन केले होते. प्रतिवर्षीप्रमाणे केवळ सहलीला जावुन जेवण व सांस्कृतिक कार्यक्रम न करता पर्यावरणपुरक काहीतरी करण्याचा विचार पुढे आला. सर्व सहकाऱ्यांच्या चर्चेतुन सहल विभाग प्रमुख महेश जाधव यांनी सहलीच्या दरम्यान बीजारोपण कऱण्याचा निश्चय केला. त्यानुसार विद्यार्थ्यांना माहिती दिली. माती व शेण सम प्रमाणात घेऊन त्यांचे योग्य मिश्रण करुन त्यामध्ये विविध झाडांच्या बिया घालुन सीडबाॅल तयार करण्याची कृतीसह जाधव यांनी माहिती दिली. त्याबरहुकुम विद्यालयातील साडेसहाशे विद्यार्थ्यांनी बिया गोळा केल्या. उपलब्ध बियांनुसार त्यांनी प्रत्येकी तीन ते पाच सीडबाॅल तयार करुन आणले. नियोजनाप्रमाणे यशवंतबाबा पावकता परिसरात वडुज रोडलगतच्या माळरानावर सीडबाॅलचे रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळाचा मनमुराद आनंद लुटत विद्यार्थ्यानी परिसरात उपलब्ध टोकदार दगडांच्या साह्याने छोटेखानी खड्डे पाडले. त्यामध्ये हळुवार सीडबाॅलचे रोपण केले. जवळील बाटलीतील उर्वरीत पाणीही त्यांनी सीडबाॅलला दिले. त्यासाठी सर्व शिक्षक सहकारी, पर्यवेक्षक मोहन माळी, प्राचार्य प्रमोद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. या आगळ्यावेगळ्या पर्यावरणपुरक सहलीचा अनुभव व त्यामुळे मिळालेला आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडुन वाहत होता. दुष्काळी भागातील शाळांनी असे पर्य़ावऱणपुरक उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वृक्षलागवडीसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणेही गरजेचे आहे. असे मत महेश जाधव व प्रमोद इनामदार यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com