छानच की...सोलापुरात सुरु झाली वैज्ञानिक प्रयोगशाळा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

  • न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते उद्‌घाटन 
  • सोलापूर शहर- जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्याला होणार लाभ 
  • गुन्ह्यांची पेन्डन्सी कमी होऊन गुन्हेगारांना होणार लवकर शिक्षा 
  • पोलिस तपासाला मिळाला आधार : पोलिस कर्मचाऱ्यांची पायपीट थांबली 

सोलापूर : राज्यातील गुन्ह्यांची पेन्डन्सी कमी करुन गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा व्हावी या हेतूने राज्यात चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर या ठिकाणी लघू न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नव्याने सुरु करण्यात आल्या. शुक्रवारी (ता. 17) न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते सोलापुरातील लघू न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्‌घाटन पार पडले. प्रयोगशाळांमुळे गुन्ह्यांची पेन्डन्सी कमी झाली असून सोलापुरातील प्रयोगशाळेचा लाभ सोलापूर शहर- ग्रामीण व उस्मानाबादला होईल, असे श्री. नगराळे यावेळी म्हणाले. 

हेही आवश्‍य वाचा : एसटीच्या वाढत्या तोट्यामुळे भरती रखडली 

मुंबई माझगाव डॉक येथे 1960 मध्ये पहिली न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरु झाली. त्यानंतर नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, नांदेड व कोल्हापुरात विभागीय प्रयोगशाळा सुरु झाल्या. मात्र, राज्यातील गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली आणि या प्रयोगशाळांवरील ताण वाढल्याने पाच नव्या प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या. सोलापुरातील प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक कनकरत्नम, प्रयोगशाळेचे संचालक डॉ. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. नितीन चुटके, सहसंचालक डॉ. संदीप शेट्टी, डी. बी. चौधरी, पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आदी उपस्थित होते. 

हेही आवश्‍य वाचा : बळीराजा कसा उभा राहणार ? कारखान्यांकडे थकबाकीचा डोंगर 

वर्षभरात चार हजार पदांची भरती 
राज्यातील विविध शासकीय व अशासकीय संस्थांना सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन झाले. राज्यातील 200 संस्थांना महामंडळाने नऊ हजार 800 सुरक्षारक्षक पुरविले आहेत. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, सर्वोपचार हॉस्पिटल, बॅंका, फिल्म सिटी, विमानतळ, पॉवर प्लॅण्ट, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, आरपीएफ, पंचतारांकित हॉटेलचा समावेश आहे. सुरक्षारक्षकांची मागणी वाढत असल्याने आगामी वर्षभरात आणखी चार हजार पदांची भरती करण्याचे नियोजन असल्याची माहिती महामंडळाचे महासंचालक कनकरत्नम यांनी दिली. 

हेही आवश्‍य वाचा : आग शमली...! आठ तासांच्या ज्वाळा : 25 बंब पाणी (VIDEO) 

महासंचालक नगराळे यांची धक्‍कादायक माहिती 

  • प्रयोगशाळेला मुद्देमाल न पाठविताच सीए रिपोर्टवर केस प्रलंबित असल्याचे सांगितले जाते 
  • रिपोर्ट तयार करुनही रिपोर्टअभावी केस प्रलंबित असल्याची माहिती दिली जाते 
  • प्रयोगशाळेने रिपोर्ट पाठवूनही संबंधित पोलिस अधिकारी तथा कर्मचारी वेळेत देत नाहीत 
  • राज्यातील वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये एक हजार 480 पदांची मंजुरी : 40 टक्‍के पदे रिक्‍तच

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scientific laboratory started in Solapur