दत्ता जाधव टोळीवर दुसरा मोक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सातारा - साखर कारखान्याच्या भंगाराचे टेंडर मिळवून देण्यासाठी  एका भंगार व्यावसायीकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दत्ता जाधव याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. दत्ता जाधववर झालेली मोक्का अंतर्गत ही दुसरी कारवाई आहे.

सातारा - साखर कारखान्याच्या भंगाराचे टेंडर मिळवून देण्यासाठी  एका भंगार व्यावसायीकाला खंडणी मागितल्याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दत्ता जाधव याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. दत्ता जाधववर झालेली मोक्का अंतर्गत ही दुसरी कारवाई आहे.

प्रतापसिंहनगर येथील गुंड दत्ता जाधव याच्या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी व गर्दी-मारामारी असे 11 गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव येथील एकाला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता. त्याचा शोध घेत असताना एक महिन्यापूर्वी तो प्रतापपूर (जत, जि. सांगली) येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी गेलेल्या तपास पथकावर हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी धडक मोहिम राबवत दत्ता जाधवला प्रतापसिंहनगरमध्ये घुसून ताब्यात घेतले. त्याच्या अटकेनंतर भुईंज येथील भंगार व्यावसायीकाने त्याच्या विरूद्ध खंडणीची फिर्याद दिली होती. संबंधीत गुन्ह्यातील तक्रारदाराला किसनवीर सहकारी साखर कारखान्यातील भंगार विक्रीचे टेंडर घ्यायचे होते. ते त्या ठिकाणी पाहणी करण्यास गेले असताना दत्ता जाधवच्या टोळीतील शुकराज व पैलवान यांनी त्यांना बाहेर घेतले. तसेच टेंडर आम्हीच मिळवून देणार आम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळावेळी त्यांच्याकडून दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत, पिस्तूलाचा धाक दाखवत 38 लाख रुपये उकळले. दत्ता जाधवला अटक झाल्यानंतर चार मे 2018 रोजी याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासामध्ये दत्ता जाधव व त्याच्या टोळीने जिवे मारण्याची धमकी देत स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी दहशत निर्माण केल्याचे व पैसे उकळल्याचे समोर आले. त्यानंतर या गुन्ह्याला मोक्का लावण्याबाबत भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक बी. आर. भरणे यांनी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजूर मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास वाईचे पोलिस उपअधिक्षक अजित टिके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Second Mokka on Datta Jadhav gang