रणसिंगवाडीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी बुजवले खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

एकमेव रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते.

बुध ः खड्ड्यात गायब झालेला गावचा रस्ता, विद्यार्थ्यांचे हाल, गावात कोण आजारी पडले तर खड्ड्यातून वाट काढत बुधला जायला तास ते आर्धा तास लागायचा. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदानातून रस्त्यातील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती केली. 
गेली चार वर्षे रणसिंगवाडी ते बुध हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर व्हावा, म्हणून ग्रामपंचायत पदाधिकारी शासन दरबारी खेटे घालत आहेत; परंतु अध्याप कसलीही हालचाल नाही. रस्त्याची चाळण झाल्याने एसटीची सेवाही बंद पडण्याच्या मार्गावर, बाजारपेठेच्या गावाशी जोडल्या जाणाऱ्या एकमेव रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. रस्त्यावरील खड्ड्यामुळे नागरिकांना दुचाकी वाहन चालवतांना व पादचाऱ्यांना चालतानाही कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या कामाकडे शासन लक्ष देत नाही. हे ओळखून उपसरपंच सुनील फडतरे, अजित गायकवाड, पोलिस पाटील सुनील रणसिंग, मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे, मनोज घाडगे, हणमंत घाडगे, पोपट रणसिंग, संजय मसुगडे, अशोक मसुगडे, विजय शिंदे, विठ्ठल जाधव, संतोष पवार, तुळशीराम शिंदे, हणमंत शिंदेसह गावातील युवकांनी आपणच आपले सरकार समजून रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेतला. श्रमदानातून खड्डे बुजविण्यास सुरवात केली. या श्रमदानात जिल्हा परिषद शालेतील शिक्षकांसह मुलामुलींनी हिरिरीने सहभाग घेतला. पावसाची तमा न बाळगता ग्रामस्थांबरोबर शेकडो चिमुकले हात दोन दिवस राबत राहिले. साडेचार किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे मुलांनी मुरूम टाकून बुजवले व दोन दिवसांत संपूर्ण रस्ता किमान वापरण्यायोग्य बनवला. रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करणारे नेते, कार्यकर्ते, राजकीय पक्ष व त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणेसमोर रणसिंगवाडीतील युवकांनी व शिक्षकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगळा आदर्श ठेवला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizens and students extinguished pits