पुतळ्याला देवपण देणारे ‘एम.जी.’

पुतळ्याला देवपण देणारे ‘एम.जी.’

कोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी. सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची दुसरी पिढीही या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचा मुलगा विनायक सुतार यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेच्या साधनेचा प्रवास आजही सुरू ठेवला आहे. 

मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार राम सारंग यांच्या ‘शिल्प साधना’ स्टुडिओत पाच वर्षांचा शिल्पकलेचा अनुभव घेऊन श्री. सुतार थेट कोल्हापूरला आले. प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांचा त्यांना सहवास लाभला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून अनेक पुतळे साकारले. त्यांची ब्राँझमधील शिल्पकला ही जिवंतपणाचा साक्षीदार म्हणून संपूर्ण कर्नाटकात पोचली आहे. 

याविषयी श्री. सुतार सांगतात, ‘‘मी बनविलेला ब्राँझचा पुतळा म्हणजेच कोल्हापूरचा एम. जी. सुतार अशीच ओळख सीमाभागात निर्माण झाली आहे. १९९३ मध्ये चिक्कोडी येथील अकरा फुटी महात्मा बसवेश्‍वर यांचा पहिला ब्राँझमधील पुतळा साकारला आणि तेथून पुढे आजतागायत अनेक पुतळे माझ्या हातून घडत गेले. काम पाहून लोक येत आहेत, हीच कामाची पोचपावती आहे.’’ 

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील कित्तूरची राणी चन्नम्मा आणि बसवेश्‍वर यांचे बहुतेक पुतळे त्यांच्याच हातून साकारले आहेत. मूळचे केदनूर (जि. बेळगाव) येथील श्री. सुतार यांनी अंगभूत कलेमुळे लहान वयातच चित्रे आणि गणेशमूर्ती साकारण्यास प्रारंभ केला. दहावीनंतर त्यांनी कोयना धरणावर कामाला सुरवात केली. फावल्या वेळेत ते चित्रे काढत.

चित्रे काढताना तेथील एका व्यक्तीने त्यांना बघितले आणि त्यांना चित्रकलेच्या परीक्षेला बसण्यास भाग पाडले. १९६७ मध्ये कोयनेला मोठा भूकंप झाल्यावर ते गावी परतले. श्री. सुतार यांनी आजअखेर महाराणी ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासह शेकडो पुतळे साकारले आहेत. हुबळी, धारवाड, गदग यांबरोबरच विजापूर, बिदरपर्यंत त्यांची शिल्पकला पोचली आहे. 

ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने केले. प्रत्येक पुतळा अभ्यास करूनच घडवला. तुम्ही जीव ओतून काम करता त्या वेळी, ती कलाकृती श्रेष्ठच बनते. याच भावनेतून काम करत गेलो. त्यामुळे संपूर्ण कर्नाटकात पोचलो.
- एम. जी. सुतार, 

ज्येष्ठ शिल्पकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com