4 सप्टेंबरला थेट मंत्रालयावर धडक 

4 सप्टेंबरला थेट मंत्रालयावर धडक 

कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता थेट मंत्रालयावर धडक देणार आहे. 4 सप्टेंबरला सकाळी येथून मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली. येथील मुस्कॉन लॉनवर झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयकांच्या बैठकीनंतर आंदोलनाची ही पुढील दिशा स्पष्ट झाली. 

दरम्यान, राज्यभरातील समाजाचा या आंदोलनाला पाठिंबा असून, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. शासनाने 31 ऑगस्टपूर्वी विशेष अधिवेशन घेऊन मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा मुंबईतील आंदोलन शांततेच्या मार्गानेच होईल. मात्र, कुठलीही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी दिला. 

श्री. सावंत म्हणाले, ""आम्ही मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार आहे. आता आरपारची लढाई लढण्यास आम्ही सज्ज झालो आहे. आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आता ते भूमिका बदलून राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर आरक्षण देऊ, असे सांगू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षण कसे देणार, हे नेमके सांगत नाहीत. आयोग सरकारच्या दबावाने अहवाल देण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे आता थेट मुंबईत धडक देणार असून, पहिली गाडी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची असेल. त्याशिवाय आता लोकप्रतिनिधींनीही आपापले पक्ष बाजूला ठेवून या आंदोलनात पुढे असले पाहिजे. त्याशिवाय जास्तीत जास्त सकल मराठा बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे.'' 

पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, प्रवीण पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, प्रा. नानासाहेब घाटे, ऍड. धनराज राणे, ऍड. दीपक भोसले, नितीन तोरस्कर, प्रमोद पाटील यांच्यासह  पश्‍चिम महाराष्ट्र सकल मराठा समन्वय समितीचे समन्वयक उपस्थित होते. 

ठराव सागराला अर्पण 
समाजाने यापूर्वी केलेल्या ठरावांसह गावागावांतून आलेल्या ग्रामसभांतील ठरावांवर सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता इंडिया गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष ठेवून हे सगळे ठराव सागराला अर्पण करणार आहे. आंदोलन फोडण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असे दिलीप देसाई म्हणाले. 

पाच हजार वाहने सज्ज 
कोल्हापूर शहरातून सध्या एक हजार वाहने आंदोलनासाठी सज्ज आहेत. जिल्ह्यातून सुमारे पाच हजार वाहने सहभागी होतील, असे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनात राज्यभरातील मराठा समाज सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रवीण पाटील यांनी सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सांगितले. संजय जाधव यांनी मुंबईच्या आंदोलनासाठी आपले पाच ट्रक देणार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com