‘सेवागिरीं’च्या जयघोषात झेंडा मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुसेगाव - ‘श्री सेवागिरी महाराज की जय’ चा गजर करत काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीनंतर झेंड्याची यात्रास्थळावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत आता शेतकरी, लोककला, युवाचैतन्य तसेच ‘ग्रामीण संस्कृतीचे ‘ समग्र दर्शन घडविण्याचे प्रयत्न होत आहेत. या मिरवणुकीत सहभागी विविध शाळांच्या सहकार्याने सेवागिरी देवस्थान ट्रस्टने विविध सामाजिक प्रश्नांबाबत प्रबोधनाचा स्तुत्य उपक्रम राबविला.

श्री सेवागिरी महाराजांच्या सत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त आजपासून (ता. ३०) ते बुधवार (ता.नऊ) दरम्यान ही यात्रा भरणार आहे. आज सकाळी नऊ वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच हेमा गोरे, उपसरपंच प्रकाश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, ट्रस्टचे माजी अध्यक्ष शामराव जाधव, शिवाजीराव जाधव, संजय जाधव, जगनशेठ जाधव, गुलाबराव वाघ तसेच विश्वनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, सुरेश पाटील, सुसेन जाधव, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी मंदिराच्या प्रांगणात हनुमानगिरी हायस्कूल, सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, शासकीय विद्यानिकेतन, कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच विविध प्राथमिक शाळांचे विद्यार्थी जमले होते. सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे पाण्याचा काटकसरीने वापर, स्वच्छतेचे महत्त्व, वृक्षारोपण, बेटी बचाओ या सामाजिक प्रश्नांची जागृती करणारे फलक तयार करून त्याद्वारे प्रबोधनाचा उपक्रम राबवला. या मिरवणुकीत पुसेगाव व परिसरातील विविध गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

छत्रपती शिवाजी चौकात विविध शाळांच्या झांज व लेझीम पथकांनी आकर्षक खेळ सादर केले. दुपारी पाऊण वाजता मिरवणूक यात्रास्थळावरील ट्रस्ट कार्यालयाजवळ झेंड्याची पारंपरिक पध्दतीने मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे योग्य नियंत्रण केले.

Web Title: Sevagiri Zenda Rally