कोल्हापूरला महापूर; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे खुले

कोल्हापूरला महापूर; राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे खुले

कोल्हापूर -  राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलीत दरवाजे खुले झाले. विजनिर्मितीसह या सातही दरवाजातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेकचा इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  भोगावती व पंचगंगा नदीतीरावर पूरस्थिती गंभीर आहे. 

अलमट्टीमधून 303525; कोयनेतून 67391

कोयना धरणातून 67391तर अलमट्टीमधून 303525 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेने 45.10 फूट इतकी पातळी गाठली असून 93 बांधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर शहर-जिल्ह्यात महापुराचा विळखा आणखीन घट्ट होत आहे. धोक्‍याचा अंदाज घेऊनच नॅशनल डिझास्टर रेस्क्‍यू फोर्स (एनडीआरएफ) यांना जिल्हा प्रशासनाने पाचारण केले आहे. पुन्हा 8 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला असून शिरोळ तालुक्‍यातील गावांना अतिवृष्टी आणि धरणांतील विसर्गाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. म्हणूनच एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. शाळा महाविद्यालयाला उद्या (सोमवारी) प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे. 

कोल्हापूर, जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 958 कुटुंबातील 3930 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्‍यातील दहा गावांमधून 461 कुटुंबातील 1994 व्यक्तींचा समावेश आहे. 

पन्हाळा तालुक्‍यात भूस्खलन झाल्यामुळे हॉटेलमधील पर्यटकांना रात्रीत पन्हाळा सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ज्यांना पन्हाळ्यावर पर्यटनासाठी जायचे आहे त्यांना बुधवार पेठेत गाडी पार्किंग करून जाता येते. अशा प्रकारचे आदेश अलीकडील काळात पहिल्यांदाच असल्याचे स्थानिकांतून सांगण्यात आले. 

शहरात व्हिनस कॉर्नरमध्ये पाणी घुसले असून पन्हाळा तालुक्‍यात भूस्खलन होत आहे. बालिंगा पुलावर पाणी आल्यामुळे तेथे जमावबंदी आदेश लागू केला आहे. जिल्ह्यात बारा पैकी सात तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच धरणातील विसर्ग कायम असल्यामुळे महापुराचा विळखा आणखी घट्ट होत आहे. रात्री नऊच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी 45 फूट 8 इंच होती. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे कोल्हापूर-सांगली मार्गासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल दीड-दोन तास वाहतूक कोंडी झाली आहे. गगनबावड्यासह अन्य तालुक्‍यात वाहतूक मार्ग बंद असल्याचे सूचना फलक मिळेल त्या दर्शनी ठिकाणी लावून वाहनधारकांना जागृत करण्यात आले आहे. 

स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती अशी

करवीर- सुतारमळा, जामदार क्‍लब, शुक्रवार पेठ, बापट कॅंप मधील 55 कुटुंबातील 187 व्यक्ती. हळदीमधून 27 कुटुंबातील 83 व्यक्ती. आंबेवाडीमधून 29 कुटुंबातील 109 व्यक्ती.

हातकणंगले तालुक्‍यातील इचलकरंजी शेळके मळा, रुई, शिरोली पु, निलेवाडी, चंदूर, भेंडवडे, घुणकी, हालोंडी आणि खोची या दहा गावांमधून 461 कुटुंबातील 1994 व्यक्ती. 

शिरोळ - नृसिंहवाडी, कुरुंदवाड न. प. गोठणपूर, कवठेसार, जुने दानवाड, शिरढोण, हेरवाड, अर्जुनवाड, दानोळी, टाकवडे आणि धरणगुत्ती या दहा गावांमधील 365 कुटुंबातील 1472 व्यक्ती.

पन्हाळा- बाजार भोगाव आणि बादेवाडीमधील 16 कुटुंबातील 55 व्यक्ती.

चंदगड - कडलगे बु., तांबुळवाडी आणि मौजे होसूर गावातील 3 कुटुंबातील24 व्यक्ती.

कागल आणि शाहूवाडी तालुक्‍यातील अनुक्रमे चिखली आणि थेरगावमधील प्रत्येकी एका कुटुंबातील 4 व 2 व्यक्तींचा स्थलांतरात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com