ग्रामीण भागातील शड्डु आवाजाचा लोप..! 

अक्षय गुंड
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- काळ बदलला अन्‌ युवकांमध्ये शहरी जीवनाचे वाढले आकर्षण 
- घरात पैलवान अन्‌ दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं 
- मारुतीच्या मंदिराजवळ किंवा तिथच आसपास तालीम असायची 
- चित्रपट, जाहिरातीमुळे युवकांचा कल हा तालमीपेक्षा जिमकडं जास्त 

उपळाई बुद्रूक : ग्रामीण भागात एकेकाळी घरात पैलवान अन्‌ दावणीला खिलार बैलांची जोडी असली की घर श्रीमंत समजलं जायचं. म्हणून गावागावात मारुतीच्या मंदिराजवळ किंवा तिथच आसपास तालीम असायची. संध्याकाळ झाली की लंगोट लपेटून कसरत करताना पैलवान दिसायचे. परंतु, काळ बदलला अन्‌ युवकांमध्ये शहरी जीवनाचे आकर्षण वाढले. परिणामी या तालमी ओस पडल्या असून कुस्तीचे आखाडे हद्दपार होऊ लागले आहेत. 
सध्याच्या जमान्यात चित्रपट, जाहिरातीमुळे युवकांचा कल हा तालमीपेक्षा जिमकडं जास्त दिसून येतो. कुस्ती हा मेहनतीचा, थोडा कसरतीचा व सरावाचाही भाग असल्याने युवकांना ते टिकवून ठेवणे जमत नाही. तसंच फास्टफूडच्या जमान्यातील आजच्या युवकांना तूप खाल्ले की रूप यावे, अशी अपेक्षा असते. शॉर्टकट इथपण आहेच. त्यामुळे बदललेल्या जीवनशैलीत खुराक इतिहासजमा होऊन त्याची जागा टॉनिकने घेतलीय. अंग मोडून मेहनतीने व्यायाम करणे कुणालाच नकोय. त्यामुळे तालमीतील लाल मातीत कोणी उतरत नाही, त्यामुळे दंड थोपटलेला आवाज काही घुमत नाही. 
पूर्वी गावोगावी कुस्ती खेळाविषयी आकर्षण असल्याने संध्याकाळच्या वेळी तालमीत व्यायाम व कसरतीसाठी करण्यासाठी गर्दी दिसून यायची. कुस्तीचे आकर्षण असल्याने गावातील यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचे आखाडे गजबजलेले असायचे. परंतु, काळ बदलला अन्‌ युवकांना चित्रपटातील हिरोची बॉडी पाहून आपणही बॉडी बनवावी अन्‌ टी-शर्ट घालून फिरावे, अशी भावना निर्माण झाली. त्यासाठी तालमीत जाऊन घाम गाळणारी पोरे आता, आधुनिक जीमला पसंती देऊ लागली. त्यात शासनाकडूनही ग्रामीण भागात तालीम, कुस्तीसाठी कसलाच निधी अथवा प्रतिसाद मिळत नसल्याने गावोगावच्या तालमीतील पैलवान जीमच्या खोलीत दिसत असल्याने तालीम व कुस्ती आखाडा ओस पडलेला दिसत आहे. 

 पाच ते सहा वर्षांपूर्वी तालमीत दरोरज 20 ते 25 पोर कसरती करायचे. त्यातील बरेच युवक पोलिस, सैन्य भरती झाले. पण अलीकडच्या काही वर्षांत तालमीत येऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या घटली आहे. 
- शिवदत्त भोसले, 
अध्यक्ष, जय हनुमान तालीम संघ, उपळाई बुद्रूक 

पूर्वी राजाश्रय असल्याने कुस्ती कला जोपासली जायची. परंतु आता लोकाश्रय आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळासाठी महत्त्व देऊन शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. कारण पैलवान हे ग्रामीण भागातच तयार होतात. परंतु त्या मानाने सध्या सुविधा मिळत नाहीत. 
- पै. अस्लम काझी, कुस्तीसम्राट 

शासनाकडून सध्या तरी तालीम अथवा ग्रामीण खेळासांठी काही विशेष निधी नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या येत्या बैठकीत यासाठी काही निधी द्यावा अशी मागणी करू. 
- रोहिणी मोरे, 
जिल्हा परिषद सदस्य, उपळाई बुद्रूक 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaddu noise in rural areas disappear ..!