ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शाहू पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

एक नजर

  • यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार गांधीवादी समाजसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर
  • जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांची घोषणा
  • एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप 

कोल्हापूर - यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार गांधीवादी समाजसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी केली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घ काळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस हा प्रदान करण्यात येतो.

यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून  तसेच हजारे यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले .

 हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवारी ( ता. २६  जून ) सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे. शाहू महाराज छत्रपती व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वितरण याचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, महापालिकेचे आयुक्त कलशेट्टी उपस्थित  होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahu award declared to Anna Hazare Kolhapur