शाहू क्रीडा संकुलाजवळची अतिक्रमणे काढा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

केवळ आमचेच दिसते का? 
आम्ही पहिल्यापासून या व्यापारी संकुलातील मूलभूत सुविधांबाबत मागणी करीत आहोत. परंतु, संकुल समिती त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा काही व्यावसायिक आपापसात करत होते. आमचेच दिसते का? समोरचे दिसत नाही का ? असा प्रश्‍नही उपस्थित करीत होते. यामुळे तहसीलदार कार्यालय ते भूविकास बॅंक या रस्त्यावरील दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सातारा - छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलानजीकच्या व्यापारी गाळ्यांमध्ये नागरिकांना अडचणीची तसेच धोकादायक ठरणारी अतिक्रमणे तातडीने व्यावसायिकांनी काढावीत, अशा सूचना जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केल्या. दरम्यान, जिल्हा क्रीडा संकुल समितीने व्यावसायिकांना तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलानजीकच्या व्यापारी गाळ्यांमध्ये होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत, याबाबतचे निवेदन नरेंद्र पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल समितीस दिले होते. त्या अनुषंगाने आज जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी श्री. पाटील यांच्यासमवेत व्यापारी संकुलाची पाहणी केली. त्यावेळी राजेंद्र चोरगे, क्रीडाधिकारी स्नेहल जगताप व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील यांनी व्यावसायिकांनी मोकळ्या जागेत लावलेले जाहिरातींचे फलक, विद्युत फलक, दुचाकी वाहनांसाठी केलेल रॅम्प, एअर कंडिशन यंत्रणेची सामुग्री, जनरेटर आदी साहित्य असल्याचे दाखविले. यामधील फलकांच्या वीज वाहक तारा खुल्या राहत आहेत. त्यामुळे जनेतस धोका पोचू शकतो, असे नमूद केले. बहुतांश गाळेधारक दुकाने बंद झाली की पदपथावर कचरा आणून टाकतात. हा कचरा रस्त्यावर पसरतो. त्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे.

काही व्यावसायिकांनी स्वतःचे दुकान दिसावे, यासाठी झाडांच्या फांद्या संपूर्णतः छाटल्याचे निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी श्री. चोरगे यांनी व्यावसायिकांना जाहिरात फलक हटविण्याच्या सूचना केल्या. त्यास काहींनी संमती दर्शवित तातडीने जाहिरात फलक हटविले. त्यानंतर व्यावसायिकांनी श्री. नाईक यांनी एअर कंडिशन यंत्रणेचे साहित्य पॅव्हेलियनच्या भिंतीला पाठीमागच्या बाजूस देता येईल का, अशी मागणी केली. भूविकास बॅंक चौकासमोरील बाजूच्या गाळ्यांमध्ये काहींनी दुकानाचे साहित्यच विक्रीसाठी बाहेर ठेवल्याचे श्री. नाईक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी व्यावसायिकांना तंबी दिली. पालिकेच्या पदपथावर चायनीज विक्रेत्याने संकुल समितीच्या जागेत तात्पुरते शेड तसेच खुर्च्या टाकून अतिक्रमण केल्यामुळे संबंधित विक्रेत्यास श्री. नाईक यांनी तातडीने साहित्य काढण्याचे आदेश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahu Sports Complex Encroachment Crime Yuvraj Naik