एकाच व्यासपीठावर दिसणार राजकीय जवळीक

राजेश पाटील
शनिवार, 29 डिसेंबर 2018

ढेबेवाडी - पाटण तालुक्‍यातील दोन मुलुख मैदानी तोफा उद्या (शनिवारी) सणबूर (ता.पाटण) येथे एकत्र धडाडणार आहेत. निमित्त आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या सत्काराचे. आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून साखरेबरोबरच सुरूंग पेरणीही होण्याची चिन्हे असल्याने जनतेत त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.  

माथाडी कामगारांचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधली. त्यांचा हा निर्णय माथाडींच्या हितासाठी सांगितला जात असला तरी, पाटण तालुक्‍याच्या राजकीय पटलावर त्याच्या दूरगामी परिणामाची शक्‍यता आहे. नरेंद्र पाटील हे कामगार चळवळीतील मुंबईस्थित नेतृत्व असले तरी पाटणच्या राजकीय पटलावर सहा वर्षांपासूनचा त्यांचा वावर आणि तालुक्‍यासाठी आलेला विकास निधी या बाबी येथील दोन्ही जुन्या परंपरागत राजकीय प्रतिस्पर्ध्यांसाठी दुर्लक्षून चालणाऱ्या नाहीत. 

आमदार (कै) अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने कार्यरत असलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांच्या सुपुत्राची नियुक्ती करून आणि त्या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देवून भाजपने नरेंद्र पाटलांचा सन्मान केला आहे. अजून थाटामाटात त्यांचा पक्षप्रवेश झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा त्यांनी दिलेला राजीनामा आणि महामंडळाच्या योजना राज्यभरात पोचविण्यासाठी पायाला भिंगरी बांधून सुरू असलेले त्यांचे दौरे या बाबी ते भाजपच्या गोटात सक्रिय झाल्याचे संकेत देत आहेत. आगामी काळात शिवसेना-भाजपची युती कायम राहिल्यास नरेंद्र पाटील हे शंभूराज देसाईंच्या व्यासपीठावर असणार, याची जाणीव ठेवून दोन्ही गटांकडून डाव-प्रतिडाव सुरू झाले आहेत. 

नरेंद्र पाटील यांच्या निवडीनंतर त्यांचे व शंभूराज देसाईंचे छायाचित्र असलेला मोठा बॅनर देसाई समर्थकांनी येथील मुख्य चौकात लावून नव्या राजकीय वाटचालीचा संदेश दिला. तर पाटणकर गटानेही विस्कटणारी घडी सावरण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरवात केली आहे. 

नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून पाटण येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांच्या कामगिरीची नोंद घेतली. यापुढे त्यांना जिल्हा परिषदेत मोठी ताकद देवून पाटणकर गटाला बळकटी देण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीकडून होवू शकतो. दरम्यान सणबूर येथे उद्या सायंकाळी पाच वाजता आमदार देसाई यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा सत्कार होणार असल्याने जनतेत त्याबद्दल कमालीचे औत्सुक्‍य आहे.

Web Title: Shambhuraje Desai and Narendra Patil on One Stage Politics