शनी मंदिराजवळील गेट बंद, अन्य दोन सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा म्हणून रेकॉर्डवर असलेला शनी मंदिराजवळील दरवाजा आज बंद राहिला, परंतु सटवाई गेट आणि लहान महालक्ष्मी मूर्ती येथून व्हीआयपी सेवा सुरूच होती. न्यायालयाने फक्त शनी मंदिराजवळीलच दरवाजाबाबत आक्षेप घेतला आहे, बाकीचे आम्ही सुरू ठेवू, असा पवित्रा यामागे असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा म्हणून रेकॉर्डवर असलेला शनी मंदिराजवळील दरवाजा आज बंद राहिला, परंतु सटवाई गेट आणि लहान महालक्ष्मी मूर्ती येथून व्हीआयपी सेवा सुरूच होती. न्यायालयाने फक्त शनी मंदिराजवळीलच दरवाजाबाबत आक्षेप घेतला आहे, बाकीचे आम्ही सुरू ठेवू, असा पवित्रा यामागे असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेतूनच दर्शन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत; पण हा आदेश धाब्यावर बसवून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शनी मंदिराजवळील दरवाजातून थेट व्हीआयपी दर्शन सेवा सुरू ठेवली. व्हीआयपी दर्शन सेवेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आज शनी मंदिराजवळील दरवाजा बॅरिकेड लावून बंद करण्यात आला. तेथून दर्शन बंद ठेवण्यात आले. परंतु सटवाई मंदिराजवळील गेटचा वापर देवस्थान समितीच्या वतीने सर्रास करण्यात येत होता. तेथे दोन सुरक्षा रक्षक किल्ली घेऊनच बसले होते. तेथून व्हीआयपी दर्शन सेवा सुरू ठेवली. 

तसेच दर्शन करून ज्या ठिकाणाहून भक्त बाहेर येतात तेथून आत सोडण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. बाहेर जाण्याच्या मार्गाचा वापर आत सोडण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे शनी मंदिराजवळील गेट बंद राहिले तरी अन्य दोन मार्गाचा वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र होते. याला लगाम कोण घालणार, असा प्रश्‍न तयार 
झाला आहे.

नियोजन नसल्याचे स्पष्ट
मुख्य दर्शन रांग येथून आज पुरुष व महिला यांना वेगवेगळेच सोडण्यात येत होते; परंतु त्यांना थांबवून सोडण्याची पद्धत आजही सुरूच होती. रांगेचे व्यवस्थापन देवस्थान समिती पाहते. परंतु मुख्य दर्शन मंडपात थांबवून सोडण्याच्या प्रकारामुळे भक्तांमध्ये नाराजी होती. मुख्य दर्शन रांगेमध्ये स्वयंसेवकच अधिक काम करताना दिसत होते. सर्वसामान्य भक्तांच्या दर्शनासाठीचे नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले. 

वेगवेगळी रांग कशासाठी?
सर्वसामान्य भक्तांना समाधान देणारे दर्शन देणे यासाठी जिल्हा प्रशासन किंवा मंदिराची देखभाल पाहणाऱ्या यंत्रणेने पाहिले पाहिजे. परंतु सर्वसामान्य भक्तांकडे दुर्लक्ष करून व्हीआयपी सेवा आणि बाकीच्या गोष्टीत सारे गुंतल्याचे दिसते. महिला व पुरुष अशी स्वतंत्र रांग पंढरपुरातील विठ्ठल मंदिर किंवा शिर्डी येथेही नाही. शिर्डीला रांग एकच असून गाभऱ्यापाशी गेल्यावर स्वतंत्र रांग होते. पहिल्यापासूनच महिला व पुरुष रांग कशासाठी, असा प्रश्‍न आता बाहेरगावावरून कुटुंबासह आलेल्या भाविकांकडून विचारण्यात येत आहे.

Web Title: shani temple gate close in kolhapur