नाटकी तरुणाच्या कृत्याने वृद्धाचा गेला हकनाक बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - युवकाच्या असंवेदनशीलतेने शंकरराव रामचंद्र मोरे (वय ६०, रा. धोत्री गल्ली, गंगावेश) हे अपघातामध्ये जखमी झाले. ‘उपचारासाठी नेतो,’ असे सांगून युवक रिक्षातून घेऊन गेला; पण त्याने यांना अर्ध्या वाटेतच सोडून दिले. अखेर मोरे यांचा उपचाराविना मृत्यू झाला.

कोल्हापूर - युवकाच्या असंवेदनशीलतेने शंकरराव रामचंद्र मोरे (वय ६०, रा. धोत्री गल्ली, गंगावेश) हे अपघातामध्ये जखमी झाले. ‘उपचारासाठी नेतो,’ असे सांगून युवक रिक्षातून घेऊन गेला; पण त्याने यांना अर्ध्या वाटेतच सोडून दिले. अखेर मोरे यांचा उपचाराविना मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना १० जुलैला घडली. आज त्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रसंग कोणताही असो, ‘एक हाक आणि मदतीला लाख’ अशीच कोल्हापूरची ओळख आहे; पण याच शहरात मानवी संवेदनशीलतेची बोथटता दर्शवणारी घटना घडली. शंकरराव रामचंद्र मोरे गंगावेशीतील धोत्री गल्लीत राहत होते. टिंबर मार्केटमधील एका साचे बनवणाऱ्या कारखान्यात ते काम करत होते.

१० जुलैला कामावरून घरी पायी निघाले असता मागून येणाऱ्या एक दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यांच्या डोक्‍याला आणि हाताला गंभीर जखम झाली. क्षणार्धात गर्दी जमली. त्यांनी दुचाकीस्वाराला अडवले. ‘आधी त्यांना दवाखान्यात नेतो,’ असे सांगून तो मोरे यांना रिक्षात घालून निघून गेला. मोरे बेशुद्धावस्थेत होते.

जावळाच्या गणपतीजवळ त्याने रिक्षा थांबवली व मोरे यांना एका दुकानाच्या पायरीवर टेकवून बसवले. त्यांचा पत्ता कोणाला कळू नये म्हणून त्यांच्या खिशातील के.एम.टी. पासचे ओळखपत्रही काढून घेतले. या वेळीही त्याला लोकांनी हटकले. ‘हे गृहस्थ चक्कर येऊन रस्त्यात पडले होते, त्यांचा पत्ता पाहून त्यांच्या घरी जातो,’ असे सांगून त्याने पळ काढला.

दुपारी ४ पर्यंत मोरे त्या पायरीवरच बेशुद्धावस्थेत होते. अखेर नागरिकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना मोरे यांचा मृत्यू झाला. हा सारा प्रसंग दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला. त्यामुळे त्या युवकाची ओळख पटली. त्याच्यावर पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. 

Web Title: Shankarao More death due to youth mistake