शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ...

शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ...

कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून, त्यासाठीच ‘अभी तो मैं जवान हूँ!’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमदेवार के. पी. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुदाळ येथे जाहीर प्रचार सभा झाली. या वेळी पवार यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ठिकठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. या सर्वांतून एकच जाणवतंय ते म्हणजे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत नुकताच महापूर येऊन गेला. हजारो लोक बेघर झाले. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. अशावेळी लोकांना धीर देण्याचे काम सरकारच्या प्रतिनिधींनी करणे आवश्‍यक होते, मात्र ते हवाई पाहणी करून गेले. जनतेच्या दु:खाची त्यांना जाणीव नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  

देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. आम्ही सत्तेत असताना ७६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. या सरकारनेही नुकतीच कर्जमाफी केली आहे. मात्र ती आहे उद्योगपतींची.

देशातील शंभर ते सव्वाशे धनिकांनी ८१ हजार कोटींचे कर्ज घेतले. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. अशा बॅंकांना व धनिकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही कर्जमाफी दिली. त्यामुळे हे सरकार शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे नसून ते धनिकांचे पाठीराखे आहे.  सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गोरगरिबांच्या अडीअडचणींशी काही देणे-घेणे नसल्याची टीका पवार यांनी केली.
के. पी. पाटील म्हणाले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. आतापर्यंत पाच निवडणुका लढलो आहे. त्यात दोन वेळा विजयी झालो आहे. यावेळची सहावी निवडणूक आहे. जनतेच्या आशीर्वादाने व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी रिंगणात आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार हे सहकारी संस्थांत खोडा घालत असल्याची टीका प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता त्यांनी केली.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे आहे. केलेल्या कोणत्याच घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. जनतेला सांगण्यासारखे सरकारकडे काहीच नाही. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. लोकशाहीत विरोधक संपवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. अशा या सरकारचा कडेलोट करा. 
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सध्या सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. आपल्याबाबीतत काही जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. गतवेळी आमचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. त्याची सल मला आणि के.पी. यांना आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आम्ही पाच वर्षे शोधत आहोत.

या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही के. पी. पाटील यांचा दणदणीत विजय होईल, हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नसल्याचे सांगितले.

सभेस माजी आमदार नामदेवराव भोईटे, निपाणीचे माजी आमदार काका पाटील, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, प्रवीणसिंह पाटील, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते.

ए.वाय. यांना त्यागाची पोच मिळेल
पवार म्हणाले, के.पी. आणि  ए.वाय. हे मेव्हणे-पाहुणे; मात्र दोघांचाही उमेदवारीसाठी आग्रह होता. त्यांच्याबाबतीत बरेच काही ऐकत होतो.  

हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्‍न माझ्यासमोर होता. हे दोघेही भेटायला आले. मी म्हणालो, दाजी मेव्हण्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. यावर ए.वाय. म्हणाले, आपण आतापर्यंत सहकार्यच करत आलो आहे. आणखी किती वेळ सहकार्य करायचे ते सांगा, असे म्हणताच एकच हशा पिकला. यावर आमचेही मेव्हणे (प्रा. एन. डी. पाटील) आहेत. मात्र परस्पर विरोधी भूमिका निभावत  राहिलो. मात्र आम्ही नात्यात कटुता येऊ दिली नाही. त्याचप्रमाणे ए.वाय. यांनी केलेला त्यागही वाया जाऊ देणार नाही. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही पहिली नावे असतील त्यात ए. वाय. पाटील यांचे नाव वाचायची संधी इथल्या जनतेला मिळेल, असे पवार यांनी सांगताच एकच जल्लोष झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com