जो शब्द पाळणार, तोच द्या; शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुचना 

जो शब्द पाळणार, तोच द्या; शरद पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुचना 

कोल्हापूर - विधानसभेच्या राधानगरी - भुदरगड मतदार संघातून कोणाला संधी द्यायची व कोणाला थांबवायचे, असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. एकास विधानसभा तर दुसऱ्यास विधान परिषद, गोकुळ, जिल्हा बॅंक अध्यक्षपद, साखर कारखाना देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना दिला. मात्र जो शब्द पाळणे शक्‍य आहे तोच शब्द द्या आणि तो पाळा, अशी सुचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना केली. तसेच या दोघात निर्माण झालेला उमेदवारीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली. 

रविवारी रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी रविवारी रात्री राधानगरी - भुदरगडच्या उमेदवारीबाबत माजी आमदार के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी एकास विधानसभेची उमेदवारी दिली तर दुसऱ्यास विधान परिषद, जिल्हा बॅंक अध्यक्षपद, गोकुळची किंवा बिद्री साखर कारखान्याची जबाबदारी देण्याची चर्चा झाली. मात्र दोघही विधानसभा उमेदवारीसाठीच आग्रही राहिल्याने, रात्री हा तिढा सुटला नाही. 

सोमवारी सकाळी ए. वाय. पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देत उमेदवारीचा तिढा सुटला नसल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. या नेत्यांनी दिलेल्या ऑफरही पाटील यांनी पवार यांच्या निदर्शणास आणून दिल्या. यावर विधान परिषदेवर तात्काळ संधी मिळणार नाही. जिल्हा बॅंक, गोकुळला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे जो शब्द पाळता येणे शक्‍य आहे, तो शब्द द्या आणि पाळा, अशी सुचना त्यांनी या नेत्यांना केली. तसेच जी काही सत्ता आहे ती विभागून घ्यावी जेणेकरुन सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी सुचना केल्याचेही सांगण्यात येत आहे. यातून बिद्री साखर कारखान्याच्या चेअरमनपदावरही येणाऱ्या काळात चर्चा होण्याचे संकेत मिळत आहेत. 

सध्या तरी विधानसभेसाठी मेव्हणे - पाहुणे आग्रही असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी पवार यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली आहे. याबाबत बोलताना आ.मुश्रीफ म्हणाले, दोन्हीही नेते उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र हा आमचा घरचा विषय आहे. एकत्र बसवून यावर निश्‍चितपणे तोडगा काढला जाईल. दोघांना व कार्यकर्त्यांना मान्य होईल, असाच तोडगा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com