esakal | आता 'हे' आव्हान आपल्याला पेलायचे आहे : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

आता 'हे' आव्हान आपल्याला पेलायचे आहे : शरद पवार

साताऱ्यातील रयत इंग्लिश मीडियम स्कूलचे "आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूल' असे नामकरण करण्यात आले आहे. त्याच्या इमारतीचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले.

आता 'हे' आव्हान आपल्याला पेलायचे आहे : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : काळ बदलत आहे. जग कुठे चालले आहे, यांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टी रुजविली पाहिजे. हे आव्हान आपण स्वीकारून या क्षेत्रात गतीने काम केले पाहिजे. संशोधन व पेटंटमध्ये "रयत'चे विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने वर्ये (ता. सातारा) येथे उभारण्यात आलेल्या रयत सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्‍टिव्हिटी सेंटरचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. तेथे त्यांनी सेंटरची आणि विद्यार्थ्यांनी मांडलेल्या वैज्ञानिक उपकरणांची पाहणी केली. त्यानंतर साताऱ्यातील रयत इंग्लिश मीडियम स्कूलचे "आप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूल' असे नामकरण आणि इमारतीचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 
कार्यक्रमास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्रतिभाताई पवार, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णास्वामी सुब्रह्मण्यम, राजीव गांधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कमिशनचे सचिव अनिल मानेकर, वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेणेद, सिनियर सायंटिफिक ऑफिसर डॉ. नरेंद्र देशमुख, राजीव गांधी सायन्स सेंटरचे डॉ. अरुण सप्रे, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. भगीरथ शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे आणि मान्यवर उपस्थित होते.
 
श्री. पवार यांनी सध्याची परिस्थिती, जागतिक पातळीवर होणारे बदल याबाबत उहापोह केला. या बदलांना सामोरे जाण्याचे आव्हान आपल्यापुढे असल्याचे त्यांनी सांगितले. सायन्स सेंटर उभारण्याचा आपला विचार आता कृतीत आला आहे. विद्यार्थ्यांत विज्ञानाविषयी आस्था रुजविण्यासाठी विज्ञान परिषद आयोजित केल्या. त्यातून मुले आता स्वतः प्रयोग करत आहेत. त्यांच्यात विश्‍वास निर्माण होऊ लागला आहे. आपला हा उपक्रम कायम स्वरूपाचा आहे. हे काम आता सर्व शाखांत सुरू करण्याचा प्रयत्न करूया, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ""मी जगभर फिरतो. परदेशात गेल्यावर तेथील विद्यापीठांना भेटी देतो. तेथे कोणती संशोधने सुरू आहेत, याची माहिती घेतो. अमेरिकेत शेतीबाबतही प्राध्यापक, विद्यार्थी संशोधन करतात. त्याची पेटंट घेतात. त्यातील लाभाचा वाटा त्यांना मिळत असतो. या मार्गाने आपण गेले पाहिजे. संशोधन आणि पेटंटमध्ये रयतचे विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत. यासाठीच संस्थेच्या कार्यकारिणीवर डॉ. अनिल काकोडकर, डॉ. माशेलकर यांच्यासारखे थोर शास्त्रज्ञ घेतले आहेत. आता हे काम आपण गतीने करूया.'' रयत इंग्लिश मीडियम स्कूलला आप्पासाहेब पाटील यांचे नाव देण्यामागचा उद्देशही त्यांनी सांगितला.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा

डॉ. काकोडकर म्हणाले, ""उपलब्ध संसाधने कमी होत आहेत. आता क्‍लायमेट इमर्जन्सीची चर्चा होऊ लागली आहे. कार्बन-डाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी झाले नाही तर आणिबाणी निर्माण होईल. यामध्ये सक्षम माणसेच टिकणार आहेत. आपण तयारी केली पाहिजे. ग्रामीण भागातही सक्षमता निर्माण केली पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे कार्य देशाला पथदर्शी आहे.'' डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. कराळे यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.

वाचा ः विरोधी पक्ष नेता म्हणाले, मुलींसाठी तो फैसला ऑन द स्पॉट