विरोधी पक्ष नेता म्हणाले, मुलींसाठी 'तो' फैसला ऑन द स्पॉट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आज 'ज्ञानश्री'च्या ज्ञानोत्सवाच्या माध्यमातून माझ्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी भावना व्यक्त केली. गॅदरींग, जल्लोष, मजा मस्ती करा पण हेच दिवस तुमच्या आयुष्यला वळण देणारे असतात हेही लक्षात ठेवा असा माैलिक सल्लाही दरेकर यांनी युवकांना दिला.

सातारा : आपला देश तुमच्या सारख्या युवकांमुळे बलाढ्य होणार आहे. तुमच्या ताकदीवर होणार आहे. त्यामुळे युवकांनी मोठी ध्येय बाळगावी. स्वतःबरोबरच समाजाचे देणे लागतो यादृष्टीने समाजहितासाठी देखील काम करण्याचा निश्‍चय करावा असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी युवा वर्गास येथे केले. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींच्या निवास व्यवस्थेचे गैरसोय ही आत्ताच्या पूढाऱ्यांमधील कार्यपद्धतीची शौकांतिकाच म्हणावी लागेल अशी खोचक टीकाही दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

सज्जनगड (ता. सातारा) नजीकच्या ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या "ज्ञानोत्सव' 2020 या कार्यक्रमाचे उदघाटन श्री. दरेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अनिल देसाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर उर्फ भाई वांगडे, सचिव ज्ञानदेव रांजणे, कार्यकारी संचालक रोहित वांगडे, प्राचार्य अजय जाधव आदींची उपस्थिती होती. दरेकर म्हणाले भाईंचे सहकार क्षेत्रातील कामाबाबत मी ज्ञात आहे. शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाबाबत मी नेहमी ऐकले आहे. पण आज ते पाहण्याचाही योग आला आहे. सज्जनगडच्या पायथ्याशी उभारलेले हे शैक्षणिक संकूल खऱ्या अर्थाने युवा पिढी ज्ञानसमृद्ध बलशाली करीत असल्याचा आनंद वाटतो. विद्यार्थी मित्रांनो कोणतीही गोष्ट एका रात्रीत उभी राहत नाही. त्यापाठीमागे असतात ते कष्ट, धैर्य आणि विश्‍वास. ज्ञानश्रीच्या उभारणीत मुंबईतील बॅंकेचा मोठा वाटा असल्याचे भाईंनी त्यांच्या भाषणात नमूद केले. मी म्हणेन मुंबईच्या बॅंकेत ज्यावेळी कर्जासाठी मागणी केली तेव्हा एका बैठकीत त्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. याचे प्रमुख कारण म्हणजे भाईंवरील विश्‍वास होय.

वाचा : आता साताऱ्यासाठी सचिन तेंडूलकर घेणार पुढाकार ?

आज ज्ञानोत्सवाच्या माध्यमातून माझ्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. आम्ही देखील गॅदरींग, जल्लोष, मजा मस्ती केली आहे. महाविद्यालयातील दिवसच आनंदी राहण्याचे, खेळण्याचे बागडण्याचे असतात. पण विद्यार्थी मित्रहो हेच दिवस तुमच्या आयुष्यला वळण देणारे असतात हेही लक्षात ठेवा. तुमचे आई वडील तुमच्यासाठी कष्ट करीत असतात. त्याची जाण तुम्ही ठेवणे गरजेचे आहे. यावेळी दरेकर त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगताना गहिवरले. ते म्हणाले माझे शिक्षण खेड्यातच झाले. घरापासून पाच किलोमीटर अंतरावर माझी शाळा होती. आमच्याकडे एसटीचा पास काढण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे मी चालतच शाळेत जात असे. शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईत आलो. विद्यार्थी चळवळ, विद्यार्थी परिषद, नेता, आमदार ते विरोधी पक्ष नेतापर्यंत मजल मारली. हे सर्व काही घडले ते माझ्या आईमुळे आणि तिने माझ्या शिक्षणासाठी केलेल्या काबाड कष्टामुळे. ज्यावेळी मी विरोधी पक्ष नेता झालो. त्यावेळचा माझ्या नावाच्या ठरावाचा सभागृहातील (नागपूर) तो प्रसंग माझी आई आमच्या गावाकडे टीव्हीवरुन पाहत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहिले. ते आनंदाचे अश्रु होते. आज माझा मूलगा महाराष्ट्रातील एक जबाबदार नेता म्हणून काम करीत असल्याचा अभिमान तिला वाटत होता. तुम्ही देखील शिकून मोठे व्हावे यासाठी आज "ज्ञानश्री'च्या माध्यमातून जे काही भाई वांगडे करीत आहेत ते खूप मौल्यवान आहे. आज महानगरांबरोबरच साताऱ्यात ते देखील "ज्ञानश्री' च्या माध्यमातून शिक्षण घेत असतानाच कॅंपस इंटरव्ह्यूयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. येथील शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील सौहादपुर्ण वातावरण म्हणजे एका कुटुंबासारखेच म्हणावे लागेल. आपला देश तुमच्या सारख्या तरुणांमुळे बलाढ्य होणार आहे. तुमच्या ताकदीवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय बाळगावी. स्वतःबरोबरच समाजाचे देणे लागतो यादृष्टीने समाजहितासाठी देखील काम करण्याचा निश्‍चय करावा असे आवाहन दरेकर यांनी केले.

...म्हणून फैसला झाला ऑन द स्पॉट

दरेकर म्हणाले विराेधी पक्ष नेता असल्याने राज्यातील चांगले वाईट हे फिल्डवर जाऊनच बघत आहे. काही दिवसांपुर्वी पालघर जिल्हातील विनवड या आदिवासी भागात गेलो. तेथील एका आश्रमशाळेला भेट दिली. आश्रम शाळेतील मुलींशी संवाद साधला. सर्व व्यवस्थित आहे असं मुली सांगत होत्या. पण त्यांच्या संवादात आत्मविश्‍वास नव्हता. मी मुलींना बोलते केले. एकीने सांगितले आम्हांला निवास व्यवस्थेची अडचणी आहे. मी पाहिले तर छोट्याशा चार खोल्यांमध्ये 200 मुली राहत आहेत. त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना विचारले तर नवीन इमारत दोन ते तीन महिन्यांपासून तयार आहे. मात्र, उद्घाटनासाठी थांबलो आहोत असे सांगितले. तेथूनच आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सर्व प्रकार सांगितला. आठवड्याच्या आत उद्घाटन करा अन्यथा मीच टाळे फोडीन असे सांगितले. काही क्षणांतच मंत्री महोदय पाडवी यांनी फाेन करुन टाळे नको तुम्हीच वसतीगृहाचा नारळ फोडाे असे नमूद केले. त्याच दिवशी सायंकाळी मी मुलींसाठी वसतीगृह खूले केले. मित्रांनो चार चार महिने वास्तु तयार असून देखील तिचा लोकापर्ण होत नाही. पुढाऱ्यांना समाजासाठी चांगले करण्यासाठी वेळ मिळत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. हे चित्र बदलण्यासाठी युवकांनी पूढे आली पाहिजे असे आवाहन दरेकर यांनी केले.

कोण आहेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर?

ज्ञानेश्‍वर उर्फ भाई वांगडे यांनी साताऱ्यात शिवसहयाद्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केल्याचे नमूद केले. ते म्हणाले शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात कार्य करीत असताना (कै.) अभयसिंहराजे भोसले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. याबरोबरच सध्याचे सातारा - जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि असंख्य लोकांचे सहकार्य लाभत असल्यानेच आज शिवसह्याद्री आणि "ज्ञानश्री' या दोन्ही शैक्षणिक संस्थांची प्रगती होत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.

भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा उपक्रम

विद्यार्थ्यांनो या... विज्ञान विश्‍वात दंग व्हा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Council Opposition Leader Pravin Darekar Criticize State Government Work