शिवेंद्रसिंहराजें विराेधात हवेत शशिकांत शिंदें !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या तरी मी सुरक्षित असून, तेथून निवडून येण्यास मला कोणतीही अडचण नाही. प्रत्येक वेळी मतदारसंघ बदलून निवडणूक लढणे मला सोयीचे होणार नाही. 
- शशिकांत शिंदे, आमदार 

 

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, त्यांचे बंधू ऋषिकांत शिंदे व माजी सभापती अमित कदम असे तीन पर्याय राष्ट्रवादीपुढे आहेत. त्यातील कोणाची बाजू खासदार उदयनराजे भोसले घेणार यावर उमेदवारीची गणिते ठरतील. दरम्यान शिवेंद्रसिंहराजेंच्या राजीनाम्यानंतर साेशल मिडियावर जावळीचा वाघ परत येताेय असे शशिकांत शिंदे यांचे छायाचित्र व्हायरल झाले.
शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशमुळे राष्ट्रवादीचा कऱ्हाड उत्तर, कोरेगाव व सातारा मतदारसंघांना जोडणारा राजकीय पूल ढासळला आहे. आगामी निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेच भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला उभे करणार, याची उत्सुकता आहे. सद्यःस्थितीत राष्ट्रवादीकडे शिवेंद्रसिंहराजेंना टक्कर देणारा सक्षम उमेदवार दिसत नाही. त्यावर पर्याय काढल्यास आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. जावळी तालुका हे त्यांचे होम पीच आहे. साताऱ्यातीली 36 गावांतही त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उतरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यास शशिकांत शिंदेंनी नापसंती व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच निवडणूक लढून शालिनीताईंना हद्दपार केले होते. त्याप्रमाणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीकडून ऐन वेळी शशिकांत शिंदेंचा पर्याय ठेवला जाऊ शकतो. त्यासोबतच सध्या भाजपमध्ये असलेले अमित कदम हे यापूर्वी राष्ट्रवादीत होते. त्यांना राष्ट्रवादीने विविध पदे, जिल्हा परिषदेचे सभापती पदही दिले होते. अजित पवार यांचे ते समर्थक होते. त्यांचे आणि शिवेंद्रसिंहराजेंचे जमत नसल्याने त्यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिली जाऊ शकते. कदमही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. आमदार शिंदेंचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचाही जावळी तालुक्‍यात संपर्क आहे. त्यामुळे त्यांनाही शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात रिंगणात उरविले जाऊ शकते. तसे झाल्यास आमदार शिंदेंची ताकदही ऋषिकांत यांना मिळू शकेल. या मतदारसंघात उदयनराजेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदारांना विरोध करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंविरोधात सर्वसामान्य आमदार निवडून आणण्याचा शब्द उदयनराजे खरा करणार का, याची उत्सुकता आहे. 
विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून कऱ्हाड उत्तर, कोरेगाव व सातारा मतदारसंघांत कमळ फुलविण्याचे मनसुबे भाजप पूर्ण करणार आहे. या मनसुब्यांना अडविण्यासाठी उदयनराजेंवर महत्त्वाची जबाबदारी आहे. ते शिवेंद्रसिंहराजेंविरोधात कोणाला रिंगणात उतरविणार, हेही महत्त्वाचे आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shashikant shinde should be contestant against shivendrasinhraje