हातकणंगलेमधून लोकसभेसाठी शौमिका महाडिक?

हातकणंगलेमधून लोकसभेसाठी शौमिका महाडिक?

कोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ. महाडिक यांचे नाव पुढे येत आहे. तर महाडिक यांच्यातीलच उमेदवारी पक्‍की समजून स्वाभिमानीने निवडणुकीची रणनीती आखली आहे. या उमेदवारीबाबतचा गौफ्यस्फोट लवकरच होण्याची शक्‍यता आहे.

गत निवडणुकीत भाजपशी गट्टी केलेल्या खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर भाजपला रामराम ठोकत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा रान उठवले आहे. दूध दर आंदोलन छेडून संघटनेने जनमानसातील आपली चाचपणी पूर्ण केली आहे. चार्ज झालेले कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या सोबतीने जात असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीचा पर्यायही त्यांनी ठेवला आहे. या बदलत्या परिस्थितीत शेट्टींना टक्‍कर कोण देणार, असा प्रश्‍न निर्माण होत असतानाच महाडिक यांचे नाव पुढे आले आहे. यामागे महाडिकांचा शिरोळ ते शिराळा असलेला संबंधच महत्त्वाचा ठरत आहे. शिरोळ तालुक्‍यात गोकुळ संचालक अनिल यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अशोकराव माने, हिंदूराव नाईक निंबाळकर, विजय भोजे आदी महाडिकांसाठी सक्रिय राहतील.

इचलकरंजीतून आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, माजी आमदार अशोक जांभळे आणि महाडिक गटाचे नगरसेवक, हातकणंगलेत महाडिक प्रेमींची संख्या लक्षणीय असून महाडिक युवा शक्‍ती व आमदार अमल महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचा समूह आहे. पन्हाळा-शाहूवाडीत गोकुळमुळे आमदार सत्यजित पाटील व भाजपमुळे माजी मंत्री कोरे यांची ताकद मिळणार आहे. 

वाळवा-शिराळा ही महाडिकांची जन्मभूमी आहे. त्यांचे बंधू नानासाहेब महाडिक यांची कर्मभूमी आहे. महाडिक यांचे दोन्ही पुत्र सम्राट आणि राहुल यांनी गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे शिरोळपासून शिराळ्यापर्यंत महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे असल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह झाल्यास नवल नाही.

महाडिक द्विधा मनःस्थितीत..
महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरूप महाडिक ताराराणी पक्षाचे प्रमुख आहेत. अमल महाडिक भाजपचे आमदार तर स्नुषा सौ. शौमिका महाडिक जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. पुतणे धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे खासदार आहेत. सांगली जिल्ह्यात महाडिक यांच्या वहिनी मीनाक्षीताई महाडिक पेठगावच्या लोकनियुक्‍त सरपंच आहेत. पुतणे राहुल पंचायत समितीचे सदस्य आहेत. दुसरे पुतणे सम्राट विधानसभेच्या तयारीत आहेत. महादेवराव महाडिक यांची गोकुळवर सत्ता असून ते पुढील विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे पुन्हा हातकणंगलेतून उमेदवारी घेण्यास महाडिक सध्या तरी द्विधा मनःस्थितीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com