स्वाभिमान असावा; अहंकार नको - शौमिका महाडिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकारणाची परिस्थिती ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ अशी झाली आहे. कदाचित देवालाच आमदारकीबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील आम्हाला द्यावयाचे होते. त्यामुळेच त्यावेळी अध्यक्षपदापासून आम्हाला दूर ठेवले असावे. माणसाला स्वाभिमान असावा; पण अहंकार असू नये. कारण स्वाभिमान पडू देत नाही आणि अंहकार उठू देत नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी आज सांगितले. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकारणाची परिस्थिती ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ अशी झाली आहे. कदाचित देवालाच आमदारकीबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील आम्हाला द्यावयाचे होते. त्यामुळेच त्यावेळी अध्यक्षपदापासून आम्हाला दूर ठेवले असावे. माणसाला स्वाभिमान असावा; पण अहंकार असू नये. कारण स्वाभिमान पडू देत नाही आणि अंहकार उठू देत नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी आज सांगितले. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शौमिका महाडिक यांचा, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या ‘गोकुळ’च्या संचालकांच्या नातेवाइकांचा सत्कार आज झाला. त्यात नूतन सदस्य रेश्‍मा राहुल देसाई, वनश्री पुरस्कारप्राप्त विजयसिंह डोंगळे यांचा समावेश होता.  
ताराबाई पार्कातील ‘गोकुळ’च्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते.

विरोधाला विरोध करणाऱ्या लोकांची प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. विकासकामांसाठी विरोध करणाऱ्यांची मानसिकताही बदलली पाहिजे, असे सांगून सौ. महाडिक म्हणाल्या, ‘‘अध्यक्षपदाच्या निवडीनंतर पहिलाच जाहीर सत्कार ‘गोकुळ’मध्ये होत आहे. हा घरचा सत्कार आहे. त्यामुळे मी आतापर्यंतच्या वाटचालीवरच बोलणार आहे. राजकारण माझं क्षेत्र नव्हे; पण माझ्या आयुष्याला कलाटणी दिली ते माझे सासरे आणि गोकुळचे कुटुंबप्रमुख म्हणून ज्यांचा याठिकाणी उल्लेख झाला ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी. आज मी सात महिन्यांच्या मुलाला घरात ठेवून फिरत आहे. पाच महिन्यांचे मूल असताना मी प्रचाराला बाहेर पडले. 

मनाला पटत नव्हते; पण अडीच वर्षांपूर्वी पती आमदार अमल महाडिक यांच्यावर झालेला अन्याय घरातही बसून देत नव्हता. २०१४ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होती. अध्यक्षपदाचा कार्यकाल संपण्यास सहा महिन्यांचा कार्यकाल असतानाही अमल महाडिक यांना अध्यक्षपद मिळू नये यासाठी खालच्या पातळीवरचे राजकारण झाले. त्यामुळे थांबण्याचा निर्णयही घेतला होता; पण कदाचित देवानेच हे सर्व घडविले असावे. घरची सर्व मंडळी माझ्या पाठिशी ठामपणे उभा राहिली. त्यामुळेच मी आज इथंपर्यंत पोचले. जिल्हा परिषदेतर्फे पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. यापुढे गोकुळ, वारणासारख्या दूध संस्था व जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन काही उपक्रम राबविण्याची गरज आहे.’’
ज्येष्ठ संचालक अरुण नरके, सत्कारमूर्ती रेश्‍मा देसाई, विजयसिंह डोंगळे यांची भाषणे झाली.

या वेळी संचालक अरुण डोंगळे, विश्‍वास जाधव, दीपक पाटील, राजेश पाटील, विलास कांबळे, अनुराधा पाटील, रामराजे कुपेकर, श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, व्यवस्थापक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रवींद्र आपटे यांनी केले. धैर्यशील देसाई यांनी आभार  मानले.

‘गोकुळ’वर फरक पडणार नाही
जिल्हा दूध संघाची मुहूर्तमेढ आनंदराव पाटील-चुयेकर यांनी रोवली. त्यांनी राजकारण बाजूला ठेवत कारभार चालविला. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे संघ चालविला तर ‘अमूल येऊ दे, नाही तर त्याचा बा येऊ दे’ गोकुळवर काही फरक पडणार नाही, असे सत्काराला उत्तर देताना विजयसिंह डोंगळे यांनी सांगितले.

पी. एन.समर्थकांची पाठ
‘गोकुळ’चे नेतृत्व करणारे पी. एन. पाटील गटाचे काही संचालक या कार्यक्रमास अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे राहुल पाटील यांनाही या सत्काराचे निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी तो चर्चेचा विषय होता.

अठरा वर्ष प्रतीक्षा 
सौ. महाडिक यांनी भाषणात इंग्रजीतून एक वाक्‍य सांगितले. नंतर त्याचा अर्थ मराठीतून सांगितला. त्याचा संदर्भ देत विश्वास पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद अध्यक्षा इंग्रजीमधून जे बोलल्या ते मला काही समजले नाही. मराठीत जे बोलल्या ते मात्र समजले. न्यायाच्या चक्राची गती संथ असते, असे त्या म्हणाल्या. मात्र त्यांच्याबाबतीत न्यायाचे चक्र अडीच वर्षात फिरले. मला मात्र अठरा वर्ष प्रतीक्षा करावी लागली.’’

Web Title: shaumika mahadik talking