मतांच्‍या गोळाबेरजेचीच चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

शिराळा - येथील नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असल्याने आता चौका चौकात मतदार याद्या हातात घेवून आपल्या विचाराचे लोक शोधून काढण्यात कार्यकर्ते मग्न आहेत. जादामताधिक्‍य कसे मिळेल याची व्युहरचना मांडून गावाबाहेरील मतदारांचा त्यांच्या पत्त्यावर शोध घेण्याची मोहिम राबवून मतांची गोळा बेरीज करण्यास सुरवात झाली आहे.

शिराळा नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. नगरपंचायत हे तालुक्‍याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख निर्माण होणार आहे. या मिनी मंत्रालयाचे पदाधिकारी होण्यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे. येथे तिरंगी लढत असल्याने आता परडे कोणाचे जड होणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. प्रत्येक चौका चौकात भावकीतील मतदान किती, पै-पाहुण्यांचे मतदान किती आणि आपल्या पक्षाचे कट्टर कार्यकर्ते व नाराजांचे पडणारे मतदान किती याची चाचपणी सर्वस्तरावर सुरू आहे. एकाच भावकीचे कोणालाही एक गठ्ठा मतदान मिळू नये याची खबरदारी प्रत्येक नेत्यांनी घेवूनच उमेदवारांची निवड केली आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळत सर्वत्र भावकीचे मतदान कसे विभागेल याची खबरदारी घेतली असली तरी त्या ठिकाणी त्या उमेदवारांचे वैयक्‍तीक संबंध त्याला मताधिक्‍य मिळवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. काही ठिकाणी पै-पाहुण्यांचे असणारे हितसंबंध उमेदवाराला फायदेशीर ठरणारे आहेत. आपल्या भावकीतील नसला तर तो आपला पाहुणा आहे म्हणून त्यास मदत करण्याच्या मानसिकतेत अनेक जण आहेत.  काही ही झाले तरी आम्हाला वातावरण कसे चांगले आहे हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांची एक वेगळी फौज निर्माण झाली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातून सत्तेच्या गोळाबेरजेची समिकरणे मांडण्यास सुरवात झाली आहे. 

अपक्षही जोरात
अन्य उमेदवारांपेक्षा मी कसा सरस आहे. हे दाखवण्यासाठी अपक्षांनीही एकला चलो रे करत घराघरात पोहचून आपल्या चिन्हाचा ठसा लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Web Title: shirala politics