शिर्डी विमानतळाचे अडले घोडे

सतीश वैजापूरकर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

विस्ताराची, उत्पन्नवाढीची आणि शिर्डीच्या सर्वांगीण विकासात मोठा सहभाग घेण्याची क्षमता असलेल्या या विमानतळाचे घोडे पायाभूत सुविधांअभावी अडले आहे.

शिर्डी ः जागेअभावी मुंबई विमानतळावर उतरू न शकणाऱ्या विमानांसाठी पार्किंग सुविधा निर्माण करून उत्पन्नात मोठी वाढ करण्याची संधी असलेले सर्वांत जवळचे विमानतळ म्हणून शिर्डी विमानतळाकडे पाहिले जाते. अवघ्या दोन वर्षांत हे विमानतळ राज्यात चौथ्या क्रमांकावर पोचले. विस्ताराची, उत्पन्नवाढीची आणि शिर्डीच्या सर्वांगीण विकासात मोठा सहभाग घेण्याची क्षमता असलेल्या या विमानतळाचे घोडे पायाभूत सुविधांअभावी अडले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे कुशल व अनुभवी मनुष्यबळ नसल्याने या विमानतळाचा विकास पुरता खुंटला आहे. 

सध्या येथे केवळ चार विमाने पार्क करण्याची सुविधा आहे. या सुविधेत तातडीने तिपटीने वाढ करण्याची गरज आहे. एक "पार्क बे' मोकळा ठेवावा लागतो. केवळ तीनच विमाने पार्क होऊ शकतात. पार्किंगची क्षमता वाढवून मुंबई विमानतळावर लॅंड न होऊ शकणारी विमाने अहमदाबाद विमानतळावर जातात. शिर्डी विमानतळ जवळचे असल्याने ही विमाने येथे लॅंड होऊ शकतील. या विमानतळाला मोठे उत्पन्न मिळेल. दोन वर्षे झाले नाईट लॅंडिंग सुविधा नाही. हे काम कासव गतीने सुरू आहे. केवळ घोषणा केल्या जातात. संधी असूनही उत्पन्नाला मुकावे लागते. सध्या अठ्ठावीस विमानांची उड्डाणे येथून होतात. हे विमानतळ देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ म्हणून ओळखले जाते. मात्र, अनुभवी मनुष्यबळ नसल्याने त्याचा विकास व प्रगती खुंटली. 

टर्मिनल बिल्डिंग कशी नसावी ते पाहायचे, तर येथे यायला हवे. वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थित चालत नाही. थंडीतही प्रवाशांना घाम फुटतो, तर उन्हाळ्यात जीव घाबरा होतो. कन्व्हेअर बेल्ट एकच असल्याने अर्ध्या तासाचा विमान प्रवास करून येणारे प्रवासी आपले सामान ताब्यात घेण्यासाठी त्याहून अधिक वेळ येथे तिष्ठत उभे असतात. टर्मिनल बिल्डिंगमधून विमानतळावर जाण्यासाठी दोनच दरवाजे आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा नित्कृष्ट असल्याने प्रवासी भलत्याच विमानाकडे जातात. त्यातून बऱ्याच वेळा गोंधळ उडतो. त्यातून कधी कधी उड्डाणाला विनाकारण उशीर होतो. संधी असूनही केवळ इच्छाशक्ती व अनुभवी मनुष्यबळाअभावी वेगाने विकसित होऊ न शकणारे हे एकमेव विमानतळ आहे. 

शिर्डी विमानतळ हे देशात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. तेथे दोनशे कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल बिल्डिंग बांधणार आहोत. पुढील महिन्यापासून येथे नाईट लॅंडिंग सुविधा सुरू होईल. 

- सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Airport hurdles