शिर्डी विमानतळावरून  "इंडिगो'चा काढता पाय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

राज्यातील सर्व विमानतळे सुरू आणि शिर्डी विमानतळ बंद ठेवण्याची वेळ येते, ही नामुष्कीची बाब आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अर्धवट स्थितीत हे विमानतळ सुरू केल्याने ही वेळ आली.

शिर्डी ः शिर्डी विमानतळ तातडीने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे सोपवावे, या मागणीचे निवेदन आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले. धुके कमी झाले, की शिर्डी विमानतळ पुन्हा सुरू होईल. कमी दृश्‍यमानतेवर मात करू शकणारी यंत्रणा महिनाभरात सुरू होईल, असे आश्‍वासन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक सुरेश काकाणी यांनी आज लोखंडे यांना दिले. दरम्यान, काल (गुरुवारी) स्पाइस जेट कंपनीने विमानतळावरील यंत्रणा हलविल्यानंतर आज इंडिगो कंपनीनेही आपली यंत्रणा अन्यत्र हलविली. 

परिसरातील धुके येत्या सोमवारपर्यंत (ता. 25) कमी झाल्यावर विमानसेवा सुरू करता येईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, विमान कंपन्यांना अधिकाऱ्यांची ही कार्यपद्धती मान्य नाही. अनिश्‍चितता व तोटा सहन करण्याची वेळ आल्याने त्यांनी येथून निघून जाणे पसंत केले. याबाबत शिवसेना नेते कमलाकर कोते म्हणाले, की शिर्डी विमानतळासाठी साई मंदिराच्या दानपेटीतून महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला 50 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. 

विमानतळ बंद ठेवण्याची नामुष्की 
राज्यातील सर्व विमानतळे सुरू आणि शिर्डी विमानतळ बंद ठेवण्याची वेळ येते, ही नामुष्कीची बाब आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अर्धवट स्थितीत हे विमानतळ सुरू केल्याने ही वेळ आली. मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला, की खासदार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीकरांचे शिष्टमंडळ त्यांच्या भेटीस जाणार आहे. हे विमानतळ "एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया' किंवा अनुभवी खासगी कंपनीकडे विनाविलंब सोपवावे, अशी आमची मागणी आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Shirdi Airport Indigo's removable legs