शिर्डी विमानतळ बुधवारपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

गेल्या 22 दिवसांपासून येथे येणारे भाविक औरंगाबाद विमानतळावर उतरत. तेथून सव्वाशे किलोमीटर अंतर मोटारीने पार करून येथे येत. खराब रस्त्याने येताना भाविकांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता.

शिर्डी  ः मागील 22 दिवसांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरील सेवा आता बुधवारपासून (ता. 11) सुरू करण्याचा निर्णय "स्पाईस जेट' कंपनीने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तसे पत्र दिल्यानंतर कंपनीने त्यास लगेच प्रतिसाद देत हा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ "इंडिगो' व "इंडियन एअरलाइन्स' या कंपन्यांनीही विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली. नाताळाच्या सुटीपूर्वी हे विमानतळ सुरू होत असल्याने, दूरवरून येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे. 

गेल्या 22 दिवसांपासून येथे येणारे भाविक औरंगाबाद विमानतळावर उतरत. तेथून सव्वाशे किलोमीटर अंतर मोटारीने पार करून येथे येत. खराब रस्त्याने येताना भाविकांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होत होता. विमानतळ ते साईमंदिर अंतरात भाविकांची ने-आण करण्यासाठी सुमारे शंभर खासगी वाहने गेल्या 22 दिवसांपासून उभी होती. त्यामुळे हे वाहनचालक व मालकांचे उत्पन्न बंद झाले. त्यांचीही आता या अडचणीतून सुटका होईल. 

हेही वाचा ः पोलिस वेळेत पोहोचल्याने दरोडा फसला 

"स्पाईस जेट'ची पूर्वी एकूण नऊ विमाने येथून ये-जा करीत होती. आता त्यांनी पहिल्या टप्प्यात सहा विमाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दिल्ली येथून एक व बंगळुरू येथून दोन बोइंग, हैदराबाद येथून दोन, तर बंगळुरू येथून येणाऱ्या एका विमानाचा समावेश आहे. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी या समस्येकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने विमानतळावर बसविलेल्या दृश्‍यमानता यंत्रणेचे सर्वेक्षण "डीजीसीए'ने केले. त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यावर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू करण्याबाबत पत्र दिले. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींनी विमानतळ सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू केल्याचे नमूद केले आहे. 

हेही वाचा ः तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार

"नाइट लॅंडिंग'ची सेवा हवी 

शिर्डी विमानतळावर "नाइट लॅंडिंग' सेवा लगेच सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ही सेवा सुरू झाल्याशिवाय शिर्डी विमानतळ फायद्यात येणार नाही. जगाच्या नकाशावर येणार नाही. कार्गो विमानसेवा सुरू होणार नाही. कमी दृश्‍यमानतेवर मात करणारी यंत्रणा व "नाइट लॅंडिंग' या विमानतळ सुरळीत चालविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांकडे महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. अर्धवट स्थितीत विमानतळ सुरू केले. आधी विमानतळ उभारणीचे काम रेंगाळले. आता विमानसेवा मध्येच बंद करण्याची वेळ आली. आपण या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. 

- खासदार सदाशिव लोखंडे 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirdi Airport starts Wednesday