वाद चिघळला ः शिर्डीत आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे 

shirdi close today
shirdi close today

शिर्डी: ""पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ आहे' या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त विधानामुळे केवळ शिर्डीकरच नाही, तर देश विदेशातील कोट्यवधी साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हे वादग्रस्त विधान ते मागे घेत नाहीत, तोपर्यंत या वादातून तोडगा निघणार नाही. शिर्डीकरांनी पुकारलेल्या "बंद'ला आपला पूर्ण पाठिंबा आहे. या बाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्याच्या वतीने सुचविलेला त्रिसदस्यीय समिचीचा तोडगा आम्हाला मुळीच मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन विधान करायला हवे होते. ते न केल्याने ही परिस्थितीत उद्‌भवली, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

शिर्डीत तीव्र प्रतिक्रिया 
मराठवाड्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असून त्याच्या विकासासाठी राज्य सरकार शंभर कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. असे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यानंतर साईबाबांची समाधी असलेल्या शिर्डीत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन उद्या (ता.19) शिर्डी बंदचे आवाहन केले. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार विखे पाटील यांनी आज येथे येऊन निवडक ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. त्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपले वादग्रस्त विधान मागे घेणे हा या वादावरील एकमेव तोडगा असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

ऋषीचे मूळ आणि नदीचे कूळ शोधू नका 
आमदार विखे पाटील म्हणाले, हे आंदोलन ग्रामस्थांनी पुकारले. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या सोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान मागे घेतले नाही तर कदाचित ग्रामस्थ बेमुदत आंदोलन पूकारतील. ब्रिटिशांनी साईबाबांच्या हयातीत त्यांचा जात व धर्म शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. ऋषीचे कुळ व नदीचे मुळे शोधू नये. 

आताच वाद का? 
साईसमाधीला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा वाद अचानक निर्माण करण्याचे काय कारण? यापूर्वी शंभर वर्षात पाथरीकरांचे 29 पुरावे कुठे गेले होते. त्यांच्या दाव्याला सरकराने पाठिंबा देऊ नये. देश-विदेशात शेकडो साईमंदिरे आहेत. साईमंदिर या नात्याने पाथरी येथील साईमंदिराला विकास निधी देण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र, ती साईजन्मभुमी आहे. या दाव्यास ग्रामस्थांचा व करोडो साईभक्तांचा विरोध आहे. पाथरीकरांनी या वादाचा संबंध शिर्डीतील अर्थकारणासोबत जोडण्याचा बेतालपणा करू नये. 

कोणीतरी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली 
मुख्यमंत्र्याची कुणी दिशाभूल केली किंवा कसे हे आपणांस ठाऊक नाही. आपला मुख्यमंत्र्यांना विरोध नाही. त्यांच्या वादग्रस्त विधानाला विरोध आहे. साईसंस्थान ने साईचरित्र ग्रंथाच्या मूळ प्रतीवरून या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करावे. या ग्रंथात कुठेही साईजन्माचा उल्लेख नाही. बाबांनी त्यांच्या हयातीत कधी त्याबाबत विधान केलेले नाही. 
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, भाजप चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, विलास(आबा) कोते, नितीन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, सचिन शिंदे, अशोक गोंदकर, सुजित गोंदकर आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

बंद म्हणून हे वगळले 
उद्या (ता.17) शिर्डी बंद असली तरी साईमंदिर दर्शनासाठी उघडे राहील. आरतीसह नित्याचे कार्यक्रम पार पडतील. भाविकांसाठी संस्थानचे भोजनालय, दवाखाने व धर्मशाळा सुरू राहातील. विमातळ व रेल्वे सेवा सुरू राहिली. तसेच तेथून साईमंदिरापर्यंतची खासगी वाहनसेवादेखील सुरू राहील. यापूर्वीच ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना खासगी हॉटेलच्या खोल्या दिल्या जातील. भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही. याची दक्षता घेऊन बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com