माझ्याबद्दलच एवढा गहजब का? - विखे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

"अर्थाचा अनर्थ करू नये, मी आहे तेथेच आहे'

"अर्थाचा अनर्थ करू नये, मी आहे तेथेच आहे'
शिर्डी - 'मी केलेल्या विधानांच्या अर्थाचा अनर्थ करू नका. मी आहे तेथेच आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री असली तरी विरोधी पक्षनेता म्हणून कामगिरी चोख आहे. विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री यांची मैत्री असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पंतप्रधानदेखील पक्ष बाजूला ठेवून कुणाचा तरी सल्ला घेतातच ना! मग माझ्याबाबतीत एवढा गहजब कशासाठी? असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

"आमच्या काही मित्रांनी एव्हाना बातम्यांची कात्रणे व चित्रफिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्याही असतील,' अशा शब्दांत विखे यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्याच वेळी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आज त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देणे मात्र त्यांनी खुबीने टाळले. विखे यांनी दोन दिवसांपूर्वी पुढाकार घेऊन शिर्डीत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.

मधुकर पिचड यांनी "निळवंडे'च्या प्रश्‍नाबाबत आज केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले, ""ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्याबाबत काही बोलू इच्छित नाही. "निळवंडे' पुनर्वसनाबाबत त्यांनी पाठविलेल्या आपद्‌ग्रस्तांना मी नोकऱ्या देऊ केल्या होत्या. प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील त्यासाठी संपादित झाल्या आहेत.''

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी मंत्री असलो तरी, माझ्या मतदारसंघातील महत्त्वाची कामे मुद्दाम अडवून धरली जायची, असा आरोप करीत विखे पाटील म्हणाले, ""समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे येथील शेतीची वाट लागली. त्या विरोधात मला मंत्रिपद पणाला लावण्याची वेळ आली. पूर्वी अडविलेली मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात मार्गी लावली. निळवंडे कालव्यांच्या कामासाठी निधीचा प्रश्‍न सोडविला. मग त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात काय गैर आहे? मी केलेल्या विधानांचा विपर्यास करण्यात आला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्या वेळी माझी अडवणूक कशी केली जायची, हे माहीत आहे.''

आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे शेतकरी जागृत झाले. सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व आम्ही घेतलेल्या परिश्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली, असा दावाही त्यांनी केला. काही लोक विधानसभेत गप्प बसतात. पक्षवाढीसाठी काही करीत नाहीत. केवळ माझ्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे पाठवितात, अशी टीका विखे पाटील यांनी पुन्हा केली.

Web Title: shirdi news radhakrishna vikhe patil talking